राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श सध्याच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा – माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव
अहमदपूर ( गोविंद काळे) : भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही रुजविण्याचा मान राजर्षी छत्रपती शाहू महाराजांकडे जातो. कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. म्हणूनच जनतेने त्यांना उत्स्फूर्तपणे ‘ लोकराजा ‘ ही उपाधी दिली. सध्याच्या राज्यकर्त्यांनीही राजर्षी शाहू महाराजांची ध्येय धोरणे अंमलात आणून त्यांचा आदर्श घ्यावा , असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘सामाजिक न्याय दिन’ व राजर्षी शाहू महाराज जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. यावेळी पुढे बोलताना बाळासाहेब जाधव म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी २८ वर्ष राज्य कारभार केला. त्यातील प्रत्येक क्षण आणि क्षण त्यांनी जनहिताचा विचार केला. त्या काळात घेतलेली सामाजिक न्यायाची त्यांची भूमिका आजही पुरोगामी महाराष्ट्रात राज्यकर्त्यांना राबविण्यात राबविता आली नाही, हे आपल्या लोकशाहीचे अपयश असून, भारताला महासत्ता बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे, असे म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीतल्या घेतलेले धोरणात्मक निर्णय तसेच विविध अनुभव कथन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महात्मा फुले महाविद्यालय स्थापनेसाठी बाळासाहेब जाधव यांच्यामुळेच हे महाविद्यालय सुरू झाले. तसेच त्यांचे सतत मार्गदर्शन लाभते.त्यामुळे महाविद्यालय प्रगतीपथावर आहे, असे नमूद करुन राजर्षी शाहू महाराज हे केवळ राजे नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते महान समाज क्रांतिकारक होते. पिढ्यानपिढ्या मागासलेल्या बहुजन समाजाला आरक्षण देऊन त्यांनी भारतात सामाजिक क्रांतीची सुरुवात केली. त्यांच्या समतावादी विचारांची समाजाला आजही गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. या कार्यक्रमास पत्रकार अहमद तांबोळी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.