शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मतदान कार्यात उत्स्फूर्त सहभाग
उदगीर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांच्या सूचनेनुसार व शिवाजी महाविद्यालय उदगीरचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून निवडणुकीच्या कार्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यापूर्वी महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदान करण्याविषयी जनजागरण केले तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली. मतदान यादीतील नाव शोधून देणे, नागरिकांच्या रांगा लावण्यासाठी मदत करणे व ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी या विद्यार्थ्यांनी विशेष कार्य केले. शहरातील अनेक मतदान केंद्रासोबतच अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या गावातील मतदान केंद्रावरही मतदान कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केली. कार्यक्रमाधिकारी प्रा. बालाजी सूर्यवंशी, डॉ. सुरेश शिंदे, डॉ, अनंत टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा पाटील, मेघा बिरादार, अश्विनी तौरपाटील, कृष्णाई गट्टेवार, कृष्णाई बिरादार, साक्षी कांबळे, गायत्री भोसले, अंजली श्रीमंगले व अनेक स्वयंसेवकांनी विशेष कार्य केले.