उदगीर विधानसभा मतदार संघात उत्साहात मतदान
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर विधानसभा मतदारसंघात मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर रांगा लावून मतदान केले. शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. उदगीर विधानसभा मतदारसंघात एकूण 359 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली असून तीन लाख 23 हजार 965 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. उदगीर मतदार संघात पुरुष मतदार एक लाख 67 हजार 638 आहेत, तर महिला मतदार एक लाख पंचावन्न हजार सहाशे चार आहेत. तसेच तृतीयपंथीय 19 मतदार आहेत, तर सैनिक 701 असे एकूण तीन लाख 23 हजार 965 मतदार आपला हक्क बजावण्यासाठी उत्साहाच्या वातावरणात मतदान केंद्रामध्ये जात होते.
चौकट…..
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना महिना दीड हजार रुपये सुरू केल्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महिला मतदारांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला. इतर वेळेपेक्षा या निवडणुकीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. हे चित्र पाहिल्यास निश्चितच महिलांचा ओढा महायुतीकडे असल्याचे चर्चिले जात होते, प्रत्येक मतदान केंद्रावर पुरुषापेक्षा महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.
चौकट…..
ना संजय बनसोडे यांच्या मताधिक्याकडे मतदारांचे लक्ष ….
उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना . संजय बनसोडे यांनी आपल्या विकास कामाच्या जोरावर मते मागितले आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि लोक कल्याणकारी योजना राबवल्यामुळे मतदार सरळ सरळ संजय बनसोडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे सांगत स्वतः मतदान करतच होते, शिवाय इतरांनाही प्रोत्साहन देत होते. हे चित्र पाहिल्यास ना. संजय बनसोडे किती मताधिक्याने विजयी होतील? यासंदर्भात गावागावातून पैजा लावल्या जात आहेत. विजयाची खात्री प्रत्येक गावातील मतदार देत आहेत. प्रश्न आहे तो किती हजाराचे मताधिक्य राहील याचाच, असेही कार्यकर्ते बोलत आहेत.
चौकट…..
आकडेमोडीमध्ये नेते आणि कार्यकर्ते मग्न
उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये 13 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. असे असले तरी प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपल्याला इतके मतदान मिळेल, प्रतिस्पर्ध्याला इतके मिळेल. असे अंदाज लावत आहेत. तसेच विजयाचे तर्क वितर्कही लावले जात आहेत.