वारकऱ्यांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – सुदर्शन मुंडे
उदगीर (एल.पी. उगीले) : पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाण्याची तीव्र इच्छा असलेल्या मात्र आर्थिक अडचणीमुळे जाऊ न शकणाऱ्या वारकऱ्यांना, पांडुरंगाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे ही देखील पांडुरंगाची सेवा आहे. या सद्भावनेने आपण वारकरी बंधूंसाठी उदगीर येथून मोफत बसेसची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. असे विचार उदगीर दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे व्यापारी असोसिएशन सेलचे अध्यक्ष सुदर्शन मुंडे यांनी व्यक्त केले. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी वारकऱ्यांसाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून देऊन, त्यांना अन्नदान करून सन्मानाने सत्कार करून पंढरपूरला पाठवताना सुदर्शन मुंडे बोलत होते.
याप्रसंगी उदगीर चे तहसीलदार रामेश्वर गोरे,उदयगिरी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन शिवाजीराव गुरूडे , तसेच प्रसिद्ध व्यापारी विनोद टवानी, मुन्ना पेन्सलवार, कल्पेश बाहेती, दत्ता बिरादार, उमेश महाजन, शैलेश अंबरखाणे, पिंटू बोथीकर ,वैजनाथ बिरादार, आतिश बियाणी, नाना मलगे ,साईनाथ कोरे, पप्पू कोरे ,लक्ष्मीकांत चिकटवार ,चंदू बारोळे ,नरसिंग चिमणचोडे, उत्तम काचबावार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सुदर्शन मुंडे म्हणाले की, काही कारणाने आपण स्वतः पंढरपूरला जाऊ शकत नसलो तरी, परमेश्वराच्या कृपेने आपण सधन आहोत. त्यामुळे आपले आद्य कर्तव्य आहे की, गरजूंना मदत करावी. या भावनेनेच आपण वारकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उदयगिरी औद्योगिक वसाहतीतील सामाजिक उपक्रमात सतत पुढाकार घेणाऱ्या उद्योगपतींनी आवर्जून उपस्थित लावून सहकार्य केल्याबद्दल ही त्यांनी ऋण व्यक्त केले.