‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी । ‘- ह.भ.प डॉ. अनिल मुंढे महाराजांनी दुमदुमवली अवघी पंढरी !
अहमदपूर, ( गोविंद काळे)
संतांनी उभारलेल्या पृथ्वीतलावरील वैकुंठनगरी असलेल्या पंढरपूर या पावनभूमीत कष्टकरी, कामगार, दीन दलित, पीडित, वंचित तसेच भांडवलदारांसह सर्वहारा वर्गांचे श्रमपरिहार हभप डॉ.अनिल महाराज मुंढे यांनी म्हणून ‘ होय होय वारकरी!पाहे पाहे रे पंढरी !’ हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन आपल्या रसाळ वाणीतून हजारोंना मंत्रमुग्ध केले आहे.
आषाढी एकादशी वारी निमित्त संपूर्ण पंढरपूर परिसर वारकऱ्यांनी गजबजलेला असून, महाराष्ट्रातील विविध भागांतून अभंग गात गात दिंड्या दाखल होत आहेत. अहमदपूर ( जि. लातूर ) येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या महात्मा फुले महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने यावर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘ सत्यशोधक वारी समतेची’ काढण्यात आली आहे.
अहमदपूर ते पंढरपूर या मार्गावरून काढण्यात आलेल्या या वारीमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा पत्रकार आणि महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठी विभागातील प्राध्यापक व सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण डॉ. अनिल महाराज मुंढे, प्रसिद्ध कवी प्रा. मारोती कसाब यांच्यासह वाहन चक्रधर हुसेन शेख सहभागी झाले आहेत. महात्मा फुले महाविद्यालयाची ही ‘सत्यशोधक समता वारी’ वाखरी येथे झालेल्या रिंगण सोहळ्यात सहभागी झाली होती. बाजीराव विहीर ते वाखरी आणि वाखरी ते पंढरी असा पायी प्रवास या वारीने केला.
सकाळी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून पायरी दर्शन घेण्यात आले. यावेळी सत्यशोधक समता वारीची भेट आळंदीहून आलेल्या घडशी वारकरी मंडळाच्या दिंडीशी झाली. या मंदिर परिसरात समता सत्यशोधक वारीतील वारकरी डॉ. अनिल महाराज मुंडे यांनी ” होय होय रे वारकरी । पाहे पाहे रे पंढरी । काय करावी साधने फळ अवघेची येणे । अभिमान नुरे कोड अवघेची उरे ।। ” हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग गाऊन व निरुपण करून हजारो वारकऱ्यांची वाहवा मिळवली. या दिंडीतील विणेकरी अरुण शिंदे, वारकरी शलाका मोरे, सुजाता मोरे यांनी डॉ. अनिल महाराज मुंढे यांच्या अभंग गायनाला साथ दिली.