महात्मा फुले कर्जमुक्ती योजना,पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करा – शिवसेनेची मागणी
अहमदपुर ( गोविंद काळे ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना लागू केलेले ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान, महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, पिक विमा यापासून शेतकरी वंचित आहेत त्यांना वरील निधिचे तात्काळ वाटप करण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लागू केली होती. या योजनेची सुरुवात होऊन एक वर्ष उलटले आहे, आजपर्यंत अनेक शेतकरी या योजने पासून वंचित आहेत. महात्मा फुले कर्जमुक्ती योजना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी २०१९ साली लागू केली होती. या योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांचे दोन लाख रुपया पर्यंतचे पिक कर्ज माफ करण्यात येणार होते, ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार होती. आजपर्यंत हजारो शेतकरी या योजने पासून वंचित आहेत. अनेक शेतकरी या लाभापासून वंचित असल्यामुळे त्रास दायक जिवन जगत आहेत. मागील वर्षी पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा लागू न करता काही मंडळासाठी लागू करण्यात आला आहे तर अनेक मंडळे वगळून शेतकऱ्यांना निराश केले आहे. त्यातील तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा टाकून इतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या दहा दिवसांत महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजना, पिक विमा तात्काळ वाटप करण्यात यावा.
अन्यथा शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येईल याची नोंद घ्यावी.
असे निवेदनाद्वारे तहसीलदार यांना कळविण्यात आले आहे. या निवेदनावर तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर, उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, संतोष आदटराव, ॲटो सेना तालुका प्रमुख शिवकुमार बेद्रे, विभाग प्रमुख माऊली देवकत्ते, सहसचिव पद्माकर पेंढारकर, उपशहरप्रमुख शिवा भारती, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, युवा सेनेचे अजय सुरनर, शाखा प्रमुख भगवान कदम, सुधाकर बालवाड यांच्या सह्या आहेत.