ना.संजय बनसोडे यांनी मतदारांचा विश्वासघात केला – अजित शिंदे
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंत्री पदासाठी शिवसेना-भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेणे, अत्यंत दुर्दैवी आणि उदगीरच्या सर्व मतदारांचा विश्वासघात करणे होय. उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनतेने भारतीय जनता पक्ष हा धार्मिक आणि जातीय उन्माद निर्माण करणारा पक्ष म्हणून त्याच्या विरोधी मतदान करून संजय बनसोडे यांना विजयी केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून कामगिरी करणाऱ्या संजय बनसोडे यांना कॅबिनेट मंत्री पदाचे आमिष दाखवताच ते सत्तेसाठी मतदारांचा सौदा करून भाजपसोबत गेले. हा जन्मताच अपमान आहे. मतदाराचा विश्वासघात करणाऱ्या नामदार बनसोडे यांचा आम्ही निषेध करत आहोत. असे जाहीरपणे पत्रकार परिषदेत जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव अजित शिंदे, काँग्रेस पक्षाचे नेते आशिष राजुरकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, अझीज पटेल, अक्षित हेरकर यांनी उदगीर येथे नक्षत्र जूस सेंटरच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर आरोप करून निषेध केला.
पुढे बोलताना अजित शिंदे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना आमदार बनसोडे हे अजित पवार यांच्यासोबत गेले आणि शिवसेना-भाजप सोबतच्या सरकारमध्ये सहभागी झाले
हे अत्यंत चुकीचे आहे. तसे तर सत्तेसाठी 2019 मध्ये देखील पहाटेच्या शपथविधीसाठी ते अजित पवार सोबत जाणारच होते, मात्र त्यावेळी शरद पवार यांनी ते बंडमोडीत काढले. त्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले. त्यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. समाजवादी विचारधारा मांनणाऱ्या उदगीर विधानसभा मतदारसंघातील सुजाण मतदारांनी डाव्या विचार धारेला प्राधान्य देत, बनसोडे यांना विजयी केले. त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये मंत्री म्हणून त्यांचे सहभागी होणे जनमताला सुसंगत होते. मात्र आता भारतीय जनता पक्षासोबत जाणे हा जनमताचा विश्वासघात आहे. ही कृती केल्याबद्दल त्यांना मतदान केलेल्या मतदारांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाल्याचे ही अजित शिंदे यांनी सांगितले. तसेच संजय बनसोडे यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करत मतदार जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.