युवकाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहरू युवा केंद्र हे सर्वोत्तम व्यासपीठ – खा. शृंगारे
लातूर (एल.पी.उगीले) : नेहरू युवा केंद्र हे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे. नेहरू युवा केंद्र लातूरच्या माध्यमातून युवकांच्या विविध कला गुणांना वाव देण्यासाठी युवा उत्सवासारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन खासदार सुधाकर शृंगारे यांनी प्रतिपादन केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा संपूर्ण देशभरात युवा उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्र लातूर द्वारा लातूर जिल्हा स्तरीय युवा उत्सवाचे आयोजन दिनांक ३० जून २०२३ रोज कृषी महाविदयालय लातूर येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून खासदर सुधाकरराव शृंगारे हे उपस्थित होते तर अध्यक्ष पद वसंतराव नाईक कृषी विदयापीठाचे कुलपती डॉ. इंद्रमणी यांनी भूषविले तर साक्षी समैया, जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र लातूर, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्राचार्य कृषी महाविदयालय लातूर, प्राचार्य हेमंत पाटील, परवेझ पटेल, संजय ममदापुरे, मुकुंद राजपंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदघाटनपर भाषणात बोलताना खासदार सुधाकरराव शृंगारे म्हणाले की, पंतप्रधान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निम्मित पुढील २५ वर्षासाठी पंचप्राण संकल्पाचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने समाजामध्ये युवकांनी राष्ट्रीय एकत्मत्ता वृद्धिगत व्हावी या उद्देशाने सर्वोतपरी कार्य करावे .
प्रास्ताविक पर भाषणात साक्षी समैया, यांनी भारत हा जगातील लोकसंख्येने तरुण असलेला देश आहे युवक हा देशाचा कणा असून युवकाच्या सर्वांगीण विकासातूनच देशाचा सर्वागीण विकास निर्भर आहे त्या साठी युवकांनी अटोकाट प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी बोलताना युवकांनी समाजाप्रती संवेदनशील राहून राष्ट्राच्या विकासात भरीव योगदान दयावे असे आवाहन केले.
युवा उत्सवात युवा कलाकार चित्रकला स्पर्धा, युवा लेखक कविता स्पर्धा, मोबाइल फोटोग्राफी स्पर्धा, भाषण स्पर्धा, सांस्कृतिक महोस्तवअंतर्गत लोकनृत्य स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवा युवतींना भाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सदरील स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संदीप जगदाळे, संजय गवई, रत्नाकर बेडगे, के बी शिखरे अन्य परीक्षकानी विशेष सहकार्य केले.
या युवा उत्सवात शासनाच्या विविध जनहित उपयोगी योजनांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभाग उमेद, अग्रणी बँक व अन्य विविध विभागाचे जनजागृतीपर स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रणव बिरादार यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय ममदापुरे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्ववीतेसाठी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशांत साबणे, रविकांत गुंजेट, खुशाल बिरादार, परमेश्वर बिरादार, भरती पोटभरे, मुजाहिद शेख, पवार प्रवीण, नवनाथ मगर, विजय डावरे यांनी विशेष परिश्रम घेतले.