रोटरीच्या वतीने मुलीच्या जन्माचे स्वागत,दर महिन्याला होणार बाळ व मातेचा सत्कार; वर्षभर चालणार उपक्रम
उदगीर (प्रतिनिधी) : मुलापेक्षा मुलींचे प्रमाण कमी होत चालले असल्याने मुलीच्या जन्माचे स्वागत अन् मातेचाही गौरव करून प्रोत्साहन देण्याचे काम रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने करण्यात येत आहे.
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने येथील सामान्य रुग्णालयात जन्म घेतलेल्या एकूण नऊ मुलींच्या जन्माचे स्वागत करून कन्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यात आला. गर्भात असलेल्या मुलीला मारून टाकणे हे फार मोठे महापाप आहे. त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्त्रियांवरील होणारे अत्याचार वाढले आहेत. मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नाही. शिवाय स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्त्री भ्रूणहत्येची समस्या कायमस्वरूपी थांबली पाहिजे. यासाठी उदगीर रोटरी क्लबच्या माध्यमातून दर महिन्याला एक दिवस म्हणजे चालू वर्षांमध्ये एकूण १२ वेळेस शहरातील विविध दवाखान्यात जावून त्या दिवशी जन्मलेल्या स्त्री जन्माचे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी जन्मलेल्या बाळास ड्रेस, मातेस ब्लाऊजपीस व पौष्टिक आहार म्हणून खारीक देण्यात येणार आहे. सामान्य रुग्णालयात स्त्री जन्माचे स्वागत करण्यात येवून रोटरी परिवारात एकही स्त्री भ्रूणहत्या होणार नाही अशी शपथ याप्रसंगी घेण्यात आले. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा मंगला विश्वनाथे, सचिव सरस्वती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन सुनीता मदनूरे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय महिंद्रकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मृत्यूजंय वंगे, डॉ. नागेश स्वामी, डॉ. विशाखा बिराजदार, अधिसेविका श्रीमती मानकोळे, रोटरीचे महानंदा सोनटक्के, प्रमोद शेटकार, रविंद्र हसरगुंडे, व्यंकट कणसे, डॉ. सुनिता चवळे, विद्या पांढरे, डॉ. सुधीर जाधव आदी उपस्थित होते.