वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीसाठी शासनाचा नवा आदेश

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशभरात वीरशैव लिंगायत समाजाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी हा दफन करून केला जातो. मात्र अनेक गावामध्ये स्मशानभुमीची सोय नसल्यामुळे वीरशैव लिंगायत समाजातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी अनेक समस्या निर्माण होत असल्याने समाजाची मागणी गाव तिथे स्मशानभुमी मिळावी अशी होती. या मागणीस प्रशासन योग्य ते सहकार्य करीत नव्हते. शासनाने 11/7/2023 रोजी सर्व जिल्हाधिकार्‍यांना आदेश देवून हा प्रश्‍न सोडविण्याचे सांगण्यात आल्याचे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी सांगितले.

लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीची गरज लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.9/2/2021 रोजी च्या आदेशान्वये सर्व जिल्हाधिकार्‍यांना गाव तिथे स्मशानभुमी उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश दिले होते. परंतू आजपर्यंत अनेक गाव, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी समाजासाठी स्मशानभुमीची जागाही उपलब्ध झाली नसल्याने समाजाच्यावतीने स्मशानभुमीचा प्रश्‍न सुटावा हि मागणी ग्रामविकास विभागाकडे 2017 मध्ये करण्यात आली होती. ग्रामविकास विभागाच्या 16/9/2010 च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागात दफनभुमीवरील कामांबाबत अटी व शर्ती नमुद करताना ज्या गावामध्ये दफनभुमीसाठी शासकीय जागा उपलब्ध नसेल तर अशा ठिकाणी खाजगी जमीन संपादित करण्यासाठी येणारा खर्च ग्रामपंचायतीला जनसुविधेसाठी विशेष अनुदान या योजनेच्या निधीतून भागविण्यात येईल असे नमुद केले आहे. तसेच धार्मीक रितीरिवाजानुसार मृतदेहावर जे संस्कार आवश्यक आहेत त्यासाठी बांधकामे, सुविधा हाती घेता येईल असे अटी शर्तीमध्ये नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार वीरशैव लिंगायत समाजातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर दफनभुमीसाठी गाव, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग मुंबई च्यावतीने उपसचिव का.गो.वळवी यांनी काढला आहे. या आदेशाचे लिंगायत महासंघाच्यावतीने स्वागत करण्यात येत आहे. या आदेशामुळे गावागावाच्या स्मशानभुमीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी सांगितले.

About The Author