अनधिकृत पोस्टर्स,बॅनर्स लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा
मनपा आयुक्तांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आदेश
लातूर (प्रतिनिधी) : शहरात अनधिकृतपणे पोस्टर्स व बॅनर्स लावणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.
शहरात लावण्यात येणाऱ्या अनधिकृत पोस्टर्स,बॅनर्स व विविध कार्यक्रमांसाठी उभारण्यात येणाऱ्या कमानी यासंदर्भात मंगळवारी (दि.१८ )आयुक्त मनोहरे यांनी बैठक बोलावली होती.या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.शहरातील पोस्टर्स व बॅनर्स संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.PIL NO १५५/२०११ या क्रमांकाच्या याचिकेवर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने अशा पद्धतीने कमानी व पोस्टर्स लावणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता वीरूपन प्रतिबंधक कायदा १९९५ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत.याच आदेशानुसार उपायुक्त (मालमत्ता)यांची नोडल ऑफिसर तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांची क्षेत्रीय प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.अनधिकृत पोस्टर व बॅनर लावणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार त्यांना प्राप्त आहेत.शहरात अशा पद्धतीने पोस्टर्स व बॅनर लावल्याचे आढळून आले तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी. संबंधितांना दंड करावा. अनधिकृत फलक व बॅनर हटवले जात नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत,असे आदेश आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी या बैठकीत दिले.
शहरातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी फलक व बॅनर लावून शहर विद्रूप करू नये.ज्यांना जाहिरात करावयाची आहे अशांनी मनपाची परवानगी घेवून ठरवून दिलेल्या ठिकाणीच फलक लावावेत.परवानगी न घेता पोस्टर्स लावल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.बॅनरची छपाई करणाऱ्या व्यावसायिकांनीही संबंधिताने बॅनर लावण्यासाठी मनपाची परवानगी घेतली आहे की नाही ? याची खात्री करावी.त्यानंतरच छपाई करावी,असे निर्देशही मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिले आहेत.