बसव प्रणित शरण चळवळ व त्यांची विचारधारा सांगणारा ‘शरण मार्ग’ – राजू जुबरे
उदगीर (एल.पी.उगीले) : महात्मा बसवेश्वरांचे पुरोगामी विचार आणि त्यांची समाजाभिमुख शरण चळवळ, जी उत्कृष्ट समाज व्यवस्थेला अभिप्रेत होती ती, अनुभव मंटपाच्या माध्यमातून विविध जातीच्या सर्व शरणांना एकत्र घेऊन कौटुंबिक विचारमूल्ये रुजवण्यासाठी चालवलेल्या अस्पृश्यता निर्मूलन, स्वातंत्र्य, कायक, दासोह या चळवळी व त्यामागचे विवरण आदी सविस्तरपणे समजून घेण्यासाठी शरण मार्ग ही साहित्यकृती महत्त्वाची आहे. असे मत प्रसिद्ध बसव तत्व विचारक राजू जुबरे यांनी व्यक्त केले.
डॉ. एम. एम. कलबुर्गी यांनी अत्यंत संशोधनपूर्वक लिहिलेल्या शरणमार्ग या मूळ कन्नड साहित्यकृतीचे मराठी भाषांतर स्वतः राजू जुबरे यांनी केलेले आहे. या साहित्यिक कृतीवर त्यांनी वाचक संवाद च्या 293 व्या पुष्पात संवाद साधला. प्रा. माधव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बोलताना ते पुढे म्हणाले की, समाज उन्नतीसाठी मांडलेला कायक व दासोह आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी शरणांनी राबवलेल्या योजना, स्नेहभोजन, स्पर्श, रक्त -संबंध सिद्धांत आणि शरणतत्त्वाचे चिंतन यावर सविस्तर अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक दृष्टीने डॉ. कलबुर्गी यांनी मांडणी केलेली आहे. ते म्हणाले की, या ग्रंथात लिंगायत साहित्य, अनुभव मंटप, शरणांची मूल्ये आणि सिद्धांत या सर्व गोष्टींचा अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. आजच्या सर्व बसव भक्त आणि अभ्यासकांसाठी ही साहित्यकृती अत्यंत मार्गदर्शक ठरणारी आहे.
शासकीय दूध डेअरी च्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे संचलन प्रा. राजपाल पाटील यांनी केले. संवादकांचा परिचय डॉ. म.ई. तंगावार यांनी करून दिला तर आभार प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी आनंद बिरादार, हनुमंत म्हेत्रे, संयोजक अनंत कदम, रामभाऊ जाधव, मुरलीधर जाधव, सुरेश वजनम, राजेंद्र एकंबेकर आदींनी परिश्रम घेतले.