संततधार अतिवृष्टीने अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत कोसळण्याच्या मार्गावर !
अतनूर (प्रतिनिधी) : जळकोट तालुक्यातील अतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सन १९८२ साली म्हणजेच ४० वर्षापूर्वी बांधलेली आहे. ती आज जीर्ण अवस्थेत आहे. गेल्या मंगळवार पासूनच्या संततधार अतिवृष्टीमुळे इमारत पूर्णपणे गळत आहे. सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करत आहेत. अक्षरशः दवाखान्यात पाण्याचे डोह साचले आहेत. कर्मचाऱ्यांना रेनकोट, छत्री लावून काम करावे लागत आहे. कधी इमारत कोसळेल सांगता येत नाही. दवाखान्याची इमारत दुरुस्ती करण्यात यावी व नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात यावे. रुग्णांच्या उपचारासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी ग्रामपंचायतीसह विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटनेने कॕबिनेट मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी लातूर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी लातूर, जिल्हाआरोग्य अधिकारी लातूर, तहसीलदार जळकोट, गटविकास अधिकारी जळकोट, तालुकाआरोग्य अधिकारी जळकोट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रूग्णांना आरोग्य केंद्रात थांबण्यासाठी देखील जागा शिल्लक नाही. रूग्णांचे बेड पावसाने भिजले आहेत. रूग्णांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे येथील वैधकिय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या व रूग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष घालून प्राथमिक आरोग्य केंद्र पाऊस बंद होईपर्यंत बंद ठेवावे, किंवा त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही होत आहे.
जिल्हा परिषद लातूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राचा दवाखाना असून त्या अंतर्गत अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, घोणसी, तिरूका, सुल्लाळी, डोंगरगाव, मरसांगवी, रावणकोळा, हळदवाढवणा, कोळनूर, लाळी (बु.), लाळी(खु.), मंगरूळ, सोनवळा, खंबाळवाडी, शिवाजीनगर, भवानीनगर, रामपूर तांडा वाडी वस्ती सह पाच उपकेंद्राचा यात समावेश आहे. अतनूर गावात दर मंगळवारी मोठा आठवडी बाजार भरतो.तसेच मोठी बाजारपेठ असल्यामुळे आजूबाजूची खेडे, तांडा-वाडी-वस्तीने गाव वसल्याने दवाखान्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या दैनंदिन असते.