शंभू उमरगा ग्रामपंचायत शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी अग्रेसर – वसंत पाटील

शंभू उमरगा ग्रामपंचायत शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी अग्रेसर - वसंत पाटील

उदगीर (एल.पी.उगीले) : ग्रामीण भागातील शेतकरी सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कोलमडून पडतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना, उदगीर तालुक्यातील शंभू उमरगा येथील ग्रामपंचायतच्या वतीने मनरेगा अंतर्गत बांबू लागवड प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. लातूर जिल्ह्यातील लोदगा तालुका औसा येथे बांबू लागवडीची प्रत्यक्ष पाहणी आणि लागवड करण्याची पद्धत, लागवड केल्यानंतर बांबू साठी उपलब्ध असलेले विक्री मार्केट अशा विविध विषयावर माजी आमदार तथा फिनिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पाशा पटेल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाच्या संदर्भात बोलताना उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत सुभाषराव पाटील यांनी स्पष्ट केले की, शंभू उमरगा ग्रामपंचायत शेतकऱ्याला स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने तथा दुष्काळग्रस्त परिस्थितीतही शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळी पिके घेऊन आर्थिक प्रगती साधता यावी. यासाठी सरपंच लिंगेश्वर स्वामी, ग्रामसेवक सीतापे, कृषी सहाय्यक पिटले, ग्राम रोजगार सेवक बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील 70 शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न झाला. शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अशा पद्धतीचे प्रयोग होणे काळाची गरज असल्याचेही वसंत पाटील यांनी यावेळी सांगितले. या मोहिमेमध्ये शंभू उमरगा ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक केले.

About The Author