आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा व धनगर समाजाचा कॅन्डल मार्च
लातूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे व धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे आणि जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी लातूर तालुक्यातील नांदगाव येथे दि. 29 रोजी सायंकाळी सात वाजत सर्व गावकरी एकत्र येऊन कॅन्डल मार्च काढण्यात आला.
नांदगाव येथील महादेव मंदिर येथुन कॅन्डल मार्च ला सुरुवात करण्यात आली. यावेळी संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढत ‘एक मराठा….लाख मराठा”, ‘एकच मिशन…मराठा आरक्षण’, ‘ ‘मराठा आमदारांच करायच काय खाली मुंडक वरती पाय’, ‘धिक्कार असो धिक्कार असो राज्य सरकार चा धिक्कार असो’, अशा घोषणा देत राजकीय नेत्यांचा व शासनाचा कडाडून निषेध नोंदवण्यात आला. तसेच गावातील तरुणांनी वेळकाढु शासनाचा तीव्र निषेध करत मराठा आरक्षणाला विरोध करणार्या स्वयंघोषित पुढार्यांचा घोषणाद्वारे जाहीर निषेध नोंदवला. व मराठा आरक्षणासाठी ज्या समाज बांधवांनी बलिदान दिले आहे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कॅन्डल मार्च मध्ये लहान, थोर तसेच मराठा व धनगर समाजातील बांधवांनी आपला लक्षणीय सहभाग नोंदवला होता.
नांदगाव गावात सर्वपक्षीय पुढार्यांना गावबंदी
एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत बॅनर लावून सर्वपक्षीय राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत गावामध्ये कोणत्याच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्याला येऊ देणार नाही अशी घोषणा देत गाव बंदी करण्यात आली आहे. यावेळी गावातील मराठा तरुण उपस्थित होते.