दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या – डॉ. नरसिंह भिकाणे
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे असे शासनाच्या जीआर मध्ये असल्याकारणाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.कर्जमाफी देणे तर सोडाच परंतु उलटपक्षी अहमदपूर तालुक्यातील व जिल्ह्यातील बँका व सोसायटी यांच्या कडून शेतकऱ्यांची कर्जे मूद्दल व व्याजासह वसुली करण्यासाठी दबाव आणला जात आहे.ते तात्काळ बंद करण्याचे आदेश आपण बँकांना काढावे व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या दारावर जाणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल धडा शिकवेल असा इशारा डॉ भिकाणे यांनी दिला आहे.कारण यावर्षी अगोदरच सोयाबीन ला भाव नाही,तूर हरभरा ही पिकेही अपेक्षित आली नाहीत त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.अग्रीम पीक विमा ही मिळालेला नाही.शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती असणाऱ्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश केला आहे असेही निवेदनात लिहिले आहे.मुख्यमंत्र्यांनीही एक तारखेपासून कर्जवसुली करू नका असा आदेशही काढला आहे परंतु गावोगाव फिरत हे बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत, ते तात्काळ थांबवण्यात यावे असे डॉ भिकाणे म्हणाले.यावेळी तालुकासचिव मदन पलमटे,मंचक सूर्यवंशी, मधुकर सूर्यवंशी, व्यनकट गायकवाड, शिवराज कासले, वैजनाथ पिटाळे, गोपीनाथ दळवे, नितीन पालमटे,राजकुमार कंदे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
