तरुण ही राष्ट्राची मौलिक संपत्ती – न्यायमूर्ती पी. डी. सुभेदार
उदगीर : (एल.पी.उगीले) तरुणांनी वेळेला महत्त्व द्यावे. वेळेचे योग्य नियोजन करावे, कारण गेलेली वेळ परत येत नसते. समाजऋण फेडण्यासाठी तरुणांनी पुढे यावे. तरुण ही राष्ट्राची मौलिक संपत्ती आहे, असे मत जिल्हा न्यायाधीश न्यायमूर्ती पी. डी. सुभेदार यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार विशेष युवक शिबिर सताळा येथील बौद्धिक क्षेत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव ऍड. एस. टी. पाटील चिघळीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होकरणे, डॉ. बंकट कांबळे, डॉ. पुष्पलता काळे, उपसरपंच सचिन सुडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना न्यायमूर्ती सुभेदार म्हणाले, तरुणांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले पाहिजे. त्याचबरोबर आई-वडिलांच्या अपेक्षा व विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सदाचारी वर्तन केले पाहिजे. ‘रासेयो’च्या विद्यार्थ्यांनी योग्य मित्रांची निवड केली पाहिजे. मित्र चांगले असतील तर आयुष्याला योग्य दिशा मिळते अन्यथा अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते, असे मत व्यक्त केले. सहसचिव ऍड. एस. टी. पाटील म्हणाले, ‘रासेयो’च्या शिबिरातून आयुष्यभराची शिदोरी मिळत असते. सर्वांगीण विकासासाठीचे माध्यम म्हणजे ‘रासेयो’चे शिबिर आहे. माणूस घडविण्याचे संस्कार केंद्र म्हणून या शिबिराचे महत्त्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘माणूस’ होण्यासाठी नवनवीन गोष्टी शिकून घ्याव्यात. अध्यक्ष समारोप करताना रामचंद्र तिरुके म्हणाले, ‘रासेयो’ स्वयंसेवक श्रमाच्या समिधा ग्रामीण भागात देत असतात. तरुणांनी सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवून ‘ग्रामीण विकास दूत’ व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले. सूत्रसंचालन रोहित भिंगे यांनी तर आभार नागेश पाटील यांनी मानले.