भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा मोर्चा

0
भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा मोर्चा

भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा मोर्चा

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर – जळकोट विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नाला धरून महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराच्या विरुद्ध मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्याचे निवेदन महसूल प्रशासनाच्या वतीने शासनाला देण्यात आले. उदगीर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महाविकास आघाडीचा मोर्चा सकाळी अकरा वाजता सुरू झाला. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर रस्त्याच्या कडेलाच मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बसवराज पाटील हे होते. या सभेत महाविकास आघाडीच्या वतीने विविध नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये प्राधान्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुका अध्यक्ष शिवाजीराव मुळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, आम आदमी पार्टीचे नेते रंगा राचुरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, माजी आमदार शिवराज तोंडचिरकर,शीलाताई पाटील, बाजार समितीच्या उपसभापती प्रीती भोसले, अरुणाताई लेंडाने, व्यंकटराव पाटील, गजानन साताळकर, श्रीमंत सोनाळे, अजित शिंदे, सोपानराव ढगे, ज्ञानेश्वर पाटील, बंटी कसबे, फिरोज देशमुख, संतोष बिरादार, बाजार समितीचे संचालक एड. पद्माकर उगिले यांच्यासह उदगीर व जळकोट तालुक्यातील मान्यवर मंडळी माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी, माजी नगराध्यक्ष उषा कांबळे, एड. प्रभाकर काळे, मनमथआप्पा किडे, मारुती पांडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजीम दायमी, प्रा. शिवाजी देवनाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यामध्ये प्राधान्याने विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर धरत शासनाचे शाळा खाजगीकरणाचे धोरण चुकीचे आहे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, यासाठी शिक्षक भरती तात्काळ सुरू करावी. शिक्षकांची जुनी पेन्शन योजना लागू करावी. बेरोजगारांची संख्या वाढत आहे त्यामुळे नोकरीचा प्रश्न निकाली लागेल अशा पद्धतीने उद्योगधंदे सुरू करावेत, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. उदगीर नगरपालिकेमध्ये भ्रष्ट कारभार सुरू आहे, त्याची चौकशी करावी. उदगीर महसूल विभागात गुंठेगिरी च्या नावाखाली होणारी लूट थांबवावी. आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी. उदगीर जिल्हा निर्माण करावा. उदगीर येथील शासकीय दूध योजना सुरू करण्यात यावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच शासनाच्या उदासीन धोरणाबद्दल तीव्र शब्दात अनेक नेत्यांनी नाराजी दर्शविली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!