उदगीर येथे संत सेवालाल महाराज भवन उभारणीसाठी सहकार्य करणार – ना.बनसोडे
उदगीर येथे संत सेवालाल महाराज भवन उभारणीसाठी सहकार्य करणार - ना.बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध लढा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली. संत सेवालाल महाराजांनी माणसाला माणुसकी शिकवली. क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांचे कार्य हे मानवी कल्याणा साठीच होते. असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले. ते उदगीर शहरात आयोजीत क्रांतीकारी सेवालाल महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.गोविंद केंद्रे, प्रमुख वक्ते विजय चव्हाण, उपसभापती प्रीती भोसले, प्रकाश राठोड, दिलीप गायकवाड, रामराव राठोड, बसवराज पाटील कौळखेडकर, भरत चामले, मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड , श्रीधर राठोड, अजित राठोड, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विलास (सिंघम ) जाधव, सचिव संजय नाईक, शिवाजी राठोड, गणेश गायकवाड, उदयसिंह ठाकुर, माजी तहसीलदार राठोड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, शहरात संत सेवालाल महाराज भवन उभारण्यात येणार असून, यासाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राज्य शासनानेही तांडा वस्ती ग्राम समृद्धी योजनेतून समाजाच्या विकासासाठी चांगला निर्णय घेतला. यातून विकासाला चालना मिळेल. गत वर्षी आपण बंजारा समाजाला शब्द दिला होता हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारणार म्हणून तो शब्द पाळला असुन वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला आहे. लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत आपण या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत. मागील काळात माझ्या फंडातुन संत सेवालाल महाराजांच्या नावाने प्रवेशव्दार उभारले. तांडा वस्ती योजनेतून कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला असुन भविष्यात बंजारा समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे ना.संजय बनसोडे यांनी सांगितले. याप्रसंगी बंजारा समाजातील गुणवंतांचा सत्कार क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्याम राठोड यांनी केले.
