एसबीआय बँकेत चोरीचा प्रयत्न
एसबीआय बँकेत चोरीचा प्रयत्न
अहमदपुर ( गोविंद काळे) : अहमदपुर येथील मुख्य शहराच्या मध्यभागी असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शनिवारी (दि.११) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. येथील भारतीय स्टेट बँक येथे ११ मे दुसरा शनिवार सुट्टीचा फायदा घेत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप कटरने तोडून बँकेत प्रवेश केला. आणि त्यानंतर चोरट्यानी आत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले. त्यानंतर चोरांनी बँकेच्या आत मुद्देमालाचा शोध घेत कॅशरुम आणि लॉकर फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. लॉकरचे कुलूप न तुटल्याने त्यांचा प्रयत्न फसला. मात्र यावेळी बँकेत लावलेले सायरन वाजले नाही हे विशेष. मॅनेजर यांनी बँकेची रोकड, मुद्देमाल असलेल्या लॉकरचे कुलूप बंद असल्याची खातर जमा करुन घेतली. त्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. यावेळी बँक प्रशासनातील मॅनेजर सुरजकुमार कश्यप यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पोलीस प्रमुख सोमय्य मुंडे, प्रशिक्षाणार्थी पोलिस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी नवदीप अगरवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.तानाजी आरदवाड,पो.कॉ.राजकुमार डबेटवार, पो.कॉ.पाराजी पुट्टेवाड यांनी गुन्हा नोंद करून पुढील तपासाची चक्रे फिरवली आहेत.
अहमदपुर येथे सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी आठावडी बाजार भरतो. मोठी बाजारपेठ असल्याने व्यावसायीक व खरेदी धारकांसाठी वर्दळ असते . त्यामुळे शुक्रवारी चोरांसाठी सोईचा दिवस निवडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे .अनेक चोरींच्या घटना या शुक्रवारच्या मध्यरात्री घडलेल्या आहेत.
रात्र पाळीला सुरक्षा रक्षक नाही
येथील बँकेच्या शाखेतून दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. मोठ्या प्रमाणात रोख रक्कमेची देवाण – घेवाण होते. तर अनेक लॉकरमध्ये ग्राहकांच्या मोल्यवान परंतु ठेवल्या आहेत. मात्र बँकेत सायरन वाजले नाही व रात्रपाळीतील सुरक्षा रक्षक नसल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
