गुणवंत विद्यार्थी हेच देशाची खरी संपत्ती : ना. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर मतदार संघातील हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. आपण कितीही मोठे झालो तरी आपली नाळ जमिनीशी असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येय ठरवावे, सकारात्मक दृष्टीकोन ठेवुन तो कृतीत आणुन आपले ध्येय गाठले पाहिजे. गुणवत्ते सोबतच संस्कार व देश प्रेमाची भावना विद्यार्थांनी अंगिकारावी, कारण गुणवंत विद्यार्थी हे देशाची खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.ते रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.यावेळी प्राचार्य डाॅ.राजकुमार मस्के, दिलीपकुमार गायकवाड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, प्रा.उषा कुलकर्णी, रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, सचिव प्रा. ज्योती मद्देवाड, प्रा.रामदास केदार, धनंजय गुडसुरकर, सुनिल हावा, उपस्थित होते.पुढे बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी, रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठाणचे कौतुक केले.तसेच सामाजिक बांधिलकी जपून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे काम रंगकर्मीच्या माध्यामातून होत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे असे सांगितले.यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिकारी झालेले अश्विन हणमंते, सुहास हणमंते, सारीका जमादार, नितीन वाघमारे यांच्यासह सीईटी व १० वी, १२ वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांचे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.महेश मळगे यांनी केले. सुत्रसंचलन रसुल पठाण यांनी केले तर आभार प्रा.बिभीषण मद्देवाड यांनी मानले.
