नियमित योगा आणि प्राणायातून मन आनंदी तर शरीर सुदृढ होते – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
नियमित योगा आणि प्राणायातून मन आनंदी तर शरीर सुदृढ होते - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : भारताने जगाला आरोग्यदायी बनविण्यासाठी योगा प्राणायामाची फार मोठी देणगी दिली आहे. नियमित योगा आणि प्राणायाम केल्यामुळे मन आनंदी तर शरीर सुदृढ राहते, असे स्पष्ट प्रतिपादन मराठी साहित्याचे ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशवंत कनिष्ठ महाविद्यालय अहमदपूरचे योगाचार्य डॉ. बालाजी कारामुंगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आपल्या देशाला बळकट करायचा असेल तर आरोग्य संपन्न पिढी निर्माण होणे आवश्यक आहे आणि ती केवळ योग्य दिनचर्येमुळे आणि योगा प्राणायामामुळे होऊ शकते असेही ते म्हणाले. यावेळी योगाचार्य डॉ. बालाजी करामुंगीकर यांनी ही योगाचे महत्त्व सांगून प्राणायाम व योगाचे अप्रतिम प्रात्यक्षिक करीत करीत करूनही घेतले.जवळपास दीड तासांच्या वर कार्यक्रम चालला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ पांडुरंग चिलगर यांनी केले तर सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे संयोजक प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
