उद्घाटनाचा झाला मोठा गवगवा !! बंदच आहे वाहतूक सिग्नलचा दिवा !!
उद्घाटनाचा झाला मोठा गवगवा !! बंदच आहे वाहतूक सिग्नलचा दिवा !!
उदगीर (एल. पी. उगीले) : शहराचा विकास होतोय, विकसित शहरासाठी ज्या ज्या म्हणून सुविधा लागतात, त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या दृष्टीने मोठा निधीही उदगीर साठी येतोय, मात्र आलेला निधी प्रत्यक्ष उद्दिष्ट पूर्तीसाठी न खर्च होता, दलाल आणि कंत्राटदारांच्या फायद्यासाठी खर्च होतोय, याची कुणाला ना काळजी ना खंत अशी अवस्था आहे.
उदगीर शहरांमध्ये बेशिस्त असलेली वाहतूक सुधारावी, वाहतुकीला शिस्त लागावी, या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून मागील दीड पावणे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सिग्नल व्यवस्था बसवण्यात आली. या व्यवस्थेचे उद्घाटन थाटामाटात झाले. मात्र पाहुण्यांनी पाठ फिरवली न फिरवली तोच या सिग्नल यंत्रनेला कोणाची तरी नजर लागली. आणि मग यंत्रणा बंद पडली. त्यानंतर पुन्हा नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने प्रयत्न करून सुरू केली, आणि कावळा उडायला आणि फाटा मोडायला गाठ पडली म्हणतात, तशा पद्धतीने ही सिग्नल व्यवस्था सुरू झाली न झाली तोच मुख्य रस्त्याचे काम निघाले आणि रस्त्याच्या खोदकामामध्ये ही सिग्नल यंत्रणा पुन्हा बंद पडली. वाहतूक व्यवस्था पुन्हा विस्कळीत झाली. जणू काही वाहतुकीची कोंडी हे उदगीरला पाचवीला पुजलेले आहे. याची अनुभूती उदगीरकरांना येऊ लागली.

दरम्यान प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या बैठका झाल्या. उदगीरची बेशिस्त असलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या अनुषंगाने मोठमोठ्या घोषणा झाल्या. मात्र प्रत्यक्ष कृती शून्यच ! अशी अवस्था झाली. त्यानंतर उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी बदलले, पोलीस प्रशासनातील अधिकारीही बदलले. आणि पुन्हा एकदा सिग्नल पूर्ववत सुरू करावेत यासाठी नागरिकांनी रेटा सुरू केल्यानंतर सिग्नल व्यवस्था सुधारली गेली, अशा पद्धतीचे परिपत्रक नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले. या प्रसिद्धी पत्रकाच्या बातम्या छापून येण्याच्या आतच पुन्हा ही सिग्नल यंत्रणा बंद पडली. ती अद्यापही सुरू झालेली नाही. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी यंत्रणा उभारून केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे चौकाचौकातील सिग्नल ह्या मोठ्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
उदगीर शहरातील डॉ. जाकिर हुसेन चौक पूर्वी ज्याला उमा चौक म्हणून ओळखले जायचे, कॅप्टन कृष्णकांत चौक, पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक या रहदारीच्या ठिकाणी बसवण्यात आलेले सिग्नल बंदच आहेत. उदगीर शहरातील सर्वात जास्त वाहतूक ही राष्ट्रीय मार्ग असलेल्या नांदेड बिदर या रस्त्यावर होत असते. तर उदगीर देगलूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होते. त्यामुळे या दोन्ही मार्गावर वाहतुकीची ठिकठिकाणी कोंडी होत असते. त्यामुळे सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी अशी फार वर्षापासून ची मागणी पूर्णत्वास आल्याचे समाधान जरी असले तरी, ती यंत्रणा कार्यरत नसल्याची खंत उदगीरच्या नागरिकांना आहे. सिग्नल यंत्रणा असून वळंबा आणि नसून कोळंबा म्हणतात, तशा पद्धतीची अवस्था झालेली आहे.
ज्या मुख्य रस्त्याच्या कामासाठी ही यंत्रणा बंद ठेवली होती की, पडली होती. तो रस्ता होऊन आता दीड वर्ष उलटला आहे. मात्र कुणालाही अद्याप सिग्नल यंत्रणा पूर्ववत सुरू करावी याची जाग आलेली नाही, हे अत्यंत दुर्दैवाने नमूद करावे लागेल. लोकप्रतिनिधींनी आपल्या चेल्या चपाट्यांना काम देऊन थातुरमातुर काम केल्याचा आरोप विरोधक करत असली तरी या सिग्नल यंत्रणेमुळे उदगीरची विस्कळीत झालेली वाहतूक कोणाला कशी नजरेत येत नाही? हे न समजणारे कोडे आहे. इतर वेळा लोक पो, पुढार्यांच्या नावाने बोटे मोडत असली तरी उठाव करायच्या वेळेला दूर राहतात. त्यामुळे शिवाजी पैदा व्हावा, पण शेजाऱ्याच्या घरी म्हणतात, त्या पद्धतीने या गोष्टीकडे फारशा गांभीर्याने कोणी पाहत नाही. आणि विस्कळीत वाहतुकीची कोंडी काही सुटत नाही, अशी अवस्था उदगीर शहराची झाली आहे.
किमान शहरातील मुख्य रस्त्यावर तरी सिग्नल व्यवस्था सुरू करावी, वाहतुकीला शिस्त लावावी, अशी नागरिकांची मागणी आहे. संध्याकाळच्या वेळेला या रस्त्यावरून पायी चालणे देखील महिलांना, मुलींना कठीण होत आहे. इतकी बेशिस्त वाहतूक या रस्त्यावर होत असते. उदगीर शहरासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा अर्थात आरटीओचे कार्यालय मंजूर झाल्याच्या घोषणा झाल्या आहेत, मात्र त्याची पूर्तता कधी होईल? याकडेही लोक वाट पाहत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उदगीरच्या अनेक बैठका मधून किमान वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी म्हणून अतिरिक्त पोलीस देण्याची घोषणा केलेली आहे, मात्र ती घोषणा हवेतच विरून गेली. असे चित्र सद्यस्थितीत तरी पाहायला मिळत आहे. उद्घाटन झाल्यानंतर पुढार्यांना या गोष्टीचे कोणतेही गांभीर्य, जाणीव राहिलेली नाही. किंवा हे चालू राहावे अशी राजकीय महत्त्वकांक्षाही कुठे दिसून येत नाही. त्यामुळे आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
