सुदृढ शरीरात निरोगी मन राहते – प्राचार्य उषा कुलकर्णी
सुदृढ शरीरात निरोगी मन राहते - प्राचार्य उषा कुलकर्णी
उदगीर (एल पी उगिले) : मानवी जीवनात शरीराला खूप महत्त्व आहे, आणि या शरीराला निरोगी आणि सुदृढ ठेवायचे असेल तर योग महत्त्वाचे आहे. कारण योगामुळे शरीरासोबत मन देखील निरोगी राहते. प्रसन्न मन आणि चिंतामुक्त चिंतन यामुळे मानवी जीवन सुखी बनते, आणि त्याचा पाया म्हणून भारतीय संस्कृतीने योगाला महत्त्व दिले आहे. योग दिन म्हणून केवळ एक दिवस योगा करून चालणार नाही तर योग ही जीवनशैली बनली पाहिजे. कारण योगामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, शारीरिक ऊर्जा निर्माण होते, आणि सकारात्मकता निर्माण झाल्याने माणसाला जगताना उत्साह येतो. असे विचार जेष्ठ योग प्रशिक्षिका प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
त्या उदगीर येथील मातृभूमी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक योग दिनानिमित्तच्या योग सप्ताहात मार्गदर्शन करताना बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड, प्रा. रणजीत मोरे, प्रा. रेखा रणक्षेत्रे, संतोष जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मातृभूमी प्रतिष्ठानच्या सचिव तथा ज्येष्ठ योग शिक्षिका उषा कुलकर्णी यांनी कृतीयुक्त योगा करून विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देत असतानाच, योगाचे महत्त्वही विशद केले. याप्रसंगी मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कस्तुरबा नर्सिंग स्कूल, मातृभूमी नर्सिंग स्कूल आणि संगणक विभागाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना उषा कुलकर्णी म्हणाल्या की, मानवी जीवनामध्ये आनंद आणि समाधान प्राप्त करण्यासाठी मन आणि शरीर यांची सांगड असली पाहिजे. कित्येक वेळा शरीर चांगले असले तरी मानसिक कमजोरी त्या व्यक्तीला आजारी बनवू शकते. त्यामुळे योगासन, प्राणायाम हे दैनिक जीवनाचा अविभाज्य अंग बनला पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. बिभिषन मद्देवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष जोशी यांनी केले.
