मतदारांचे प्रेम आणि विश्वास हिच माझी शक्ती – ना.संजय बनसोडे
मतदारांचे प्रेम आणि विश्वास हिच माझी शक्ती - ना.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : मागील ५ वर्षाच्या काळात मतदार संघात हजारो कोटींचा विकास निधी खेचुन आणुन मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केला. हे केवळ मतदार संघातील जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळेच ,आता येत्या काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आपण सर्व बुथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाच्या घरात जावून आपले काम सांगा, असे आवाहन केले.
आपल्या सर्वांचे माझ्यावरचे प्रेम हिच माझी शक्ती असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील शिवम मंगल कार्यालयात आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहर व ग्रामीण बुथ व कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी बोलत होते.यावेळी प्रदेश सरचिटणीस अॅड.व्यंकटराव बेद्रे, जिल्हाध्यक्ष अफसर शेख, पंडित धुमाळ, समीर शेख, प्रवीण भोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, प्रा.श्याम डावळे, बालाजी भोसले, सय्यद जानीमियाँ, सुदर्शन मुंडे,वसंत पाटील, शशिकांत बनसोडे, प्रकाश राठोड, अॅड.दिपालीताई औटे, अभिजीत औटे, रोहिदास कुंडगिर, बाबुराव अंबेगावे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी,
मी सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा कॅबिनेट मंत्री केवळ आपल्या मतामुळे झालो. आपल्या मताची किंमत पक्ष नेतृत्वाने ठेवुन मला मंत्री पदाची जबाबदारी दिली. मात्र मी आज राज्याचा मंत्री असुनही माझ्या अंत:करणात कार्यकर्ता जिवंत आहे.
मागील चार वर्षाच्या काळात सर्व समाज घटकांना न्याय दिला असुन मतदार संघातील अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीमागे मी नेहमी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही ना.बनसोडे यांनी दिली.
मागील ५ वर्षे मी सदैव जनतेच्या सेवेत असुन माझ्या मतदार संघातील प्रत्येक गावात कमीत कमी १० ते २० वेळा जावून तेथील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. उदगीर – जळकोट तालुक्यासोबत ग्रामीण भागातील सर्व जनतेचे वीज, पाणी, आरोग्याच्या सुविधेसह सर्व मूलभूत सुविधा पुरविल्या, येत्या काळात सर्व गावे स्मार्ट करण्याचा मानस असल्याचे ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.
