लोककल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ शाहू महाराजांनी रोवली – प्रा. प्रवीण जाहुरे
लोककल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ शाहू महाराजांनी रोवली - प्रा. प्रवीण जाहुरे
उदगीर (एल.पी.उगीले) : मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा करून कोल्हापूर संस्थांनच्या माध्यमातून शाहू महाराजांनी सामाजिक क्रांती घडवून आणली, तसेच शाहू महाराज हे स्वतः राजे असून देखील त्यांनी आपल्या सुसंस्कृत कार्यप्रणालीच्या माध्यमातून लोककल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. असे मत प्रा. प्रवीण जाहूरे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्था सदस्य मन्मथ बिरादार, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. जे. आर. कांदे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. जाहूरे म्हणाले की, शिक्षण सुप्त शक्तीचा आविष्कार करत असते, याची जाणीव ठेवून गोर-गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा, शिष्यवृत्तीची योजना, वैदिक विद्यालयाची निर्मिती शाहू महाराजांनी केली. त्यामुळे सामाजिक न्याय, समता, बंधुता प्रस्थापित होण्यासाठी मदत झाली. शाहू महाराजांचा शैक्षणिक विचार सर्वांनी अनुकरणात आणावा, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना रामचंद्र तिरुके म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी विशाल सामाजिक दृष्टिकोनातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे कार्य केले. महापुरुष त्यांनी केलेल्या कार्यामुळे अजरामर होत असतात. महापुरुषांच्या कार्यातून आपणही प्रेरणा घ्यावी, असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले. सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी तर आभार प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी मानले.
