मैत्री” प्रशिक्षणातून बेरोजगार युवकांची कौशल्यवृद्धी शक्य – डॉ. नानासाहेब सोनवणे

0
मैत्री" प्रशिक्षणातून बेरोजगार युवकांची कौशल्यवृद्धी शक्य - डॉ. नानासाहेब सोनवणे

मैत्री" प्रशिक्षणातून बेरोजगार युवकांची कौशल्यवृद्धी शक्य - डॉ. नानासाहेब सोनवणे

उदगीर (एल पी उगिले) : ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांची “मैत्री” प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य वृद्धी करणे शक्य आहे. असे प्रतिपादन विभागीय पशुसंवर्धन आयुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे यांनी केले.
ते “राष्ट्रीय गोकुळ मिशन” अंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आणि पशु प्रजनन विभाग पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण भारतासाठी बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोपाळ भारकड तर व्यासपीठावर डॉ. श्रीधर शिंदे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त लातूर आणि डॉ. अनिल पाटील प्रकल्प सहसमन्वयक हे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांसाठी कृतिशील कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. कौशल्य वृद्धी झाल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी मैत्री प्रशिक्षणामधून मोठे योगदान मिळू शकेल. अशी अपेक्षा डॉ. नानासाहेब सोनवणे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणातून प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोपाळ भारकड यांनी तरुणांनी प्रशिक्षण कालावधीमध्ये महाविद्यालयातील तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि आपल्या ज्ञानाचा फायदा पशुपालकांच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन केले. डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील 30 सुशिक्षित बेरोजगार तरुण सहभागी होणार असल्याचे सांगितले. महाविद्यालयात त्यांना एक महिना व्याख्यान व जनावरांमधील कृत्रिम रेतन विषयक प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार असून पुढील दोन महिने प्रशिक्षणार्थींना त्यांच्या रहिवासी ठिकाणी पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम रेतन विषयक प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार असल्याची ही माहिती या प्रसंगी डॉ. श्रीधर शिंदे यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, दुधाळ जनावरांमध्ये कृत्रिम वेतन करून शुद्ध वंशावळी व अधिक दूध देणारे पशुधन निर्माण करण्यासाठी कुशल व तांत्रिक मनुष्यबळ तयार करणे, हे या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राहुल सूर्यवंशी यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!