नुसतेच मार्कवंत नाही तर माणुसकी जपणारे गुणवंत बना – उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे

0
नुसतेच मार्कवंत नाही तर माणुसकी जपणारे गुणवंत बना - उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे

नुसतेच मार्कवंत नाही तर माणुसकी जपणारे गुणवंत बना - उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे

उदगीर(एल.पी.उगीले) : मानवी जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व असून ते मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेतील गैरप्रकाराकडे लक्ष न देता, जिद्दीने अभ्यास करावा. उद्याचा दिवस सोन्याचा करायचा असेल तर आजच कष्ट करा, व नुसतेच मार्कवंत न होता माणुसकी जपणारे गुणवंत बना. असे प्रतिपादन दि.लिं. होळीकर प्रतिष्ठान द्वारे आयोजित गुणगौरव सोहळ्यात बोलताना उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी केले.
दि.लिं. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित उदगीर शहरातील सर्व शाळांमधून सर्वप्रथम आलेल्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा लायन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे विश्वस्त सदस्य ईश्वरप्रसाद बाहेती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व दि.लिं. होळीकरांच्या प्रतिमापूजनांनी झाली. यावेळी उषाताई तोंडचिरकर यांनी स्वागत गीत गायले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ .दत्ताहरी होनराव यांनी केले.
यावेळी उदगीर शहरातील सर्व शाळेतून दहावी बोर्ड परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या 27 विद्यार्थी, विद्यार्थिनीचे तर बारावी बोर्ड परीक्षेतून सर्वप्रथम आलेल्या 18 विद्यार्थ्यांचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, देवमाणूस ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एमपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या लोहारा येथील अनुजा व्यंकटराव मोमले या बालविकास अधिकारी पदावर निवड झालेल्या विद्यार्थिनीचा व श्रद्धा राजकुमार आतनुरे या कर निर्धारण अधिकारी पदावर निवड झालेल्या विद्यार्थिनीचा व सावरगाव येथील परमेश्वर बाबुराव बिरादार यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात अनुजा मोमले या विद्यार्थीनींने मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी देखील आपले अनुभव सांगत ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचलन प्रा. डॉ. माधव कांबळे यांनी तर आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम जाधव यांनी मांडले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुरलीधर जाधव, यशवंत बिरादार, प्रकाश साखरे , वीरभद्र स्वामी, तुकाराम बिरादार, बाबुराव सोमवंशी, लायन्स नेत्र रुग्णालयाचे रवी जवळे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!