काँग्रेस पक्षाच्या खच्ची करण्यासाठी बाजार समितीत हस्तक्षेप – सभापती हुडे
काँग्रेस पक्षाच्या खच्ची करण्यासाठी बाजार समितीत हस्तक्षेप - सभापती हुडे
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख आणि काँग्रेस पक्षाचे नेते माजी पालकमंत्री आ. अमित भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होने बाकी आहेत. नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका होणे बाकी आहेत. सध्या प्रशासकीय कार्यकाल चालू आहे. मात्र बाजार समितीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असून लोकाभिमुख कारभार चालू आहे.
लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने अनेक लोक कल्याणकारी योजना सुरू केल्या होत्या. त्या योजनांचे ते केवळ साक्षीदारच नव्हे तर आईसाहेब वैशालीताई देशमुख यांच्याच हस्ते बालिका बचाव योजनेचे उद्घाटन ही झाले होते. उदगीर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या घरी मुली जन्मल्यानंतर या योजनेअंतर्गत मुलींच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेवले जात होते. त्याचाही फायदा हजारो शेतकऱ्यांना झाला. मात्र दुर्दैवाने त्या योजनांना खिळ घालण्याचे पाप तत्कालीन भाजपच्या नेत्यांनी केले होते. परिणामतः गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, हमाल, मापाडी यांच्या हिताच्या निर्णयाला बाधा आली होती. अनेक वर्ष लोककल्याणकारी योजना पासून लाभार्थी दूर होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकात काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पॅनल प्रचंड बहुमताने विजयी झाले, आणि पुन्हा लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्धार आम्ही घेतला. मात्र काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात लोक कल्याणाची कामे केली तर राजकीय दृष्ट्या काँग्रेस सक्षम होईल. असा संकुचित वृत्तीचा विचार करून सत्तेतील लोकांनी बाजार समितीमध्ये हस्तक्षेप करून आमच्या विरोधामध्ये कोर्टकचेऱ्या लावल्या आहेत. नुकताच जिल्हा उपनिबंधिकाचा निकाल आला आहे. त्यामध्ये माझ्यासहित इतर चौघांना अपात्र ठरवले आहे. या संदर्भात आपण कायदेशीर लढा लढणारच आहोत. लोककल्याणाची कामे करत असताना कोणी जर मुद्दाम हस्तक्षेप करावा म्हणून अडथळे आणत असेल तर, जनतेच्या हिताचा विचार करून तसेच लोककल्याणकारी योजना राबवण्याची हमी आम्ही मतदारांना दिली आहे, त्याची पूर्तता करण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षमपणे कृषी उत्पन्न बाजार समिती चालवून दाखवेल. असा आपल्याला विश्वास आहे. असे विचार प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी व्यक्त केले आहेत.
गोरगरीब शेतकऱ्यांचा विमा असेल, हमाल, मापारी यांचा विमा असेल, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेतली जाणारी शिबिरे असतील, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी घेतली जाणारी शिबिर असतील, शेतकऱ्यांचा माल योग्य हमीभाव प्राप्त होईपर्यंत साठवून ठेवण्यासाठी शेतमाल तारण योजना असेल, अशा एक ना अनेक योजना आम्ही कृतिशीलपणे राबवून दाखवणार आहोत, राबवत आहोत. मात्र सत्ताधाऱ्यांना हे सहन होत नाही. त्यामुळे अडथळ्याची शर्यत आमच्या पाठीमागे लावून एका अर्थाने लोककल्याणाची कामे करण्याला ते रोखत आहेत, हे दुर्दैव आहे. तरी देखील आम्ही कितीही विरोध झाला तरी दुप्पट जोमाने कामे करून दाखवू. असाही विश्वास याप्रसंगी शिवाजीराव हुडे यांनी बोलून दाखवला आहे.
