विधानसभेची लगबग : इच्छुकांच्या उदगीर वाऱ्या सुरू !! समाजकार्याचे देखावे अन् लोककल्याणाचे नाट्य सुरू !!
विधानसभेची लगबग : इच्छुकांच्या उदगीर वाऱ्या सुरू !! समाजकार्याचे देखावे अन् लोककल्याणाचे नाट्य सुरू !!
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असल्यामुळे, अनेक इच्छुकांनी या विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवला आहे. आपण फार मोठे समाजसेवक आहोत, असे दाखवण्यासाठी आपल्या एखाद दुसऱ्या कार्यकर्त्याकडून शासकीय रुग्णालयात केळी वाटप, धर्मादाय नेत्र रुग्णालयाकडून मोफत नेत्र तपासणीचे शिबिर आयोजन, अशा पद्धतीच्या फुकटातल्या कार्यक्रमावर जोर दिला जातो आहे.
ज्यांचा उदगीर विधानसभा मतदारसंघाशी दुरान्वयानेही संबंध नाही, असे हौसे, गौसे, नवसे सध्या उदगीर शहरात फिरताना दिसू लागले आहेत. अशा इच्छुकांना शोधून त्यांना तिकीट मिळवून देतो, असे सांगून आपल्या चुंगल मध्ये फसवणारे ही बरेच पुढारी निर्माण झाले आहेत. माझी मोठमोठ्या नेत्यांशी ओळख आहे, अशा बतावण्या करून त्यांना मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्याही घडवून आणत आहेत. काही गर्भ श्रीमंताच्या दिवट्या चिरंजीवांना देखील आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आपल्यालाच उमेदवारी दिली जाईल, अशी भाबडी अशा घेऊन ते उदगीर विधानसभा मतदारसंघात चकरा मारू लागले आहेत. कालपर्यंत ज्यांचे नाव, गावही उदगीर विधानसभा मतदारसंघातील एकाही मतदारांना माहिती नव्हते, ते देखील मीच भावी आमदार असे म्हणून मिरवू लागले आहेत. काही जणांनी तर अंध, अपंग, मतिमंद शाळा मधून पाच-दहा विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, फळे वाटप असे कार्यक्रमही आयोजित करून आपण फार मोठे समाजसेवक असल्याचे बॅनर लावत आहेत. एकंदरीत राजकीय घडामोडी आणि या इच्छुक उमेदवारांची केविलवाणी धडपड पाहिल्यास अनेकांना नवलच वाटू लागले आहे. आपल्याला मोठ्या राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळेल, असा विश्वास तरी यांना कसा निर्माण होतो? असाही प्रश्न काही जाणकार राजकारणी लोकांना पडू लागला आहे. एक मात्र नक्की, चार पैसे कमावण्यासाठी मुंबई, पुण्याला जाऊन थोडेफार श्रीमंत झालेले लोक लगेच आमदारकीचे स्वप्न पाहत उदगीर विधानसभा मतदार संघाकडे येऊ लागले आहेत, आणि प्रामाणिकपणे कमावलेला पैसा राजकारणात गमावण्याची दाट शक्यता आहे. अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. संजय बनसोडे यांनी अनेक विकासकामे केल्याचा गवगवा आहे, तसेच या मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून त्यांचा दांडगा जनसंपर्कही आहे. इतके जग जाहीर असताना देखील काही श्रीमंताची पोर आपणच आमदार होऊ शकतो, अशी आशा घेऊन उदगीर विधानसभा मतदारसंघावर गिरट्या घालू लागली आहेत. केवळ श्रीमंती आणि पैशाच्या जोरावर आपण निवडणुका जिंकू शकतो असा फाजिल आत्मविश्वास घेऊन येणारे उमेदवार काय विकास करतील? त्यांना विकासाची जाण तरी आहे का? किमान इतका तरी उदगीर विधानसभा मतदार संघातील सुजाण मतदार निश्चित विचार करेल.
चौकट….
एक केळ आणि प्रसिद्धीचा मेळ….
या पावसाळी छत्री याप्रमाणे उगवलेल्या नेत्यांना समाजसेवा कशाशी खातात? हेही माहिती नाही. मात्र आपली प्रतिमा उजळून आपण समाजसेवक आहोत. अशा तोऱ्यात फिरण्यासाठी शासकीय रुग्णालयातील रुग्णांना सात-आठ कार्यकर्त्यांसह जाऊन एखाद दुसरी केळी देऊन, त्याचे फोटो सेशन करून त्याची प्रसिद्धी करण्यात हे मग्न आहेत. वास्तविक पाहता रुग्णालयातील रुग्ण हे लाचार नाहीत, किंवा त्यांना देऊ शकाल इतकी दानत तुमच्यात नाही, तरीही उठ की सूट रुग्णांना फळे वाटप, असे कार्यक्रम आयोजित करून समाजसेवक असल्याचा देखावा मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
चौकट……
डॉ. लखोटिया अनेकांसाठी दैवत…..
आपल्या अशा नवख्या नेत्याला आपल्या पेल्यात उतरउन, समाजसेवक घडवत असताना, समाज उपयोगी कार्यक्रम दाखवावेत म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याला पहिल्यांदा उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय आठवते. कारण या रुग्णालयाच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा केली जाते. त्याचे शिबिर आयोजन केले जाते. आणि त्याचे श्रेय घेण्याची संधी अशा फुकटच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटते. अशा लोकांसाठी या उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया हे जणू दैवतच आहेत. असे म्हटले तर वावगे होणार नाही.
