सिमावर्ती भागात कोवळ्या पिकावर हरणाचा कळप, डुकराचा ताव शेतकरी त्रस्त
उदगीर (एल.पी.उगीले) : सीमाभागामध्ये कमालनगर तालुक्यामधील दापका परिसरामध्ये दापका, गंगनबीड, आकनापूर, चिखली, नंदीबिजलगाव, होकर्ना, खेर्डा, चिमेगाव, हांदीखेर , गणेशपुर वागणगीर , मूर्की, चिमेगाव, भंडारकुंमठा, माळेगाव, सावरगाव, बावलगाव , बोंथी या परिसरात काही भागात सोयाबीनची पेरणी झालेली आहे. या भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे, तुर, मुग, सोयाबीन या कोवळ्या पिकावर हरणाचे कळप, रान डुक्कर ताव मारत आहेत. परिणामत: या वन्य प्राण्यापासून नासदुस होत असल्याने, शेतकरी हाताश झालेला आहे. वन्य प्राणी पिकाचे नुकसान करत आहेत . त्यामुळे यंदा तरी चांगले पीक हातात येईल, अशी अशा शेतकऱ्यांना होती.परंतु एकीकडे निसर्गाचा कोप, दुसरीकडे जंगली प्राण्याकडून कोवळ्या पिकाची नासदुस वाढलेली आहे. वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. शेत शिवारात हरणाच्या कळपाने हौदास घातला आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. या परिसरात पावसाने वेळेवर हजेरी लावलेली नाही. त्यामुळे बळीराजा चिंतातूर झालेला आहे. आता उगवण झालेल्या पिकाची नासदुस वन्यप्राण्यामार्फत होत आहे .यामुळे शेतकरी हाताश झाला आहे. शेतकऱ्यांनी आपली व्यथा कोणाकडे मांडावी? व शेतकऱ्यांचा वाली कोण आहे? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय यंत्रणांनी या वन्य प्राण्याला आळा घालून शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी भारत कृषी समाज कर्नाटक राज्याचे कमाल नगर तालुका अध्यक्ष अंकुश लक्ष्मणराव वाडीकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने वेळेच्या आत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकऱ्याना फौज फाटा घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल आणि या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार राहील. असा इशाराही वाडीकर यांनी दिला आहे.
