पहिल्याच पावसात नालीचा कठडा गेला वाहून, रस्ता ही खचू लागला !
उदगीर (एल. पी. उगिले) :उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात विकास निधी येऊ लागलेला आहे. मात्र त्या विकास निधीच्या पोटी निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचाराला जन्म घालण्याचे पाप केले जात आहे, असा आरोप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. पावसाळ्यातील छत्र्याप्रमाणे उगवलेले गुत्तेदार कार्यकर्ते विकास निधीच्या कामात जास्तीत जास्त कसा फायदा लाटता येईल? यामध्ये चढाओढ लावत आहेत. परिणामतः दर्जेदार काम होत नाही, आणि कामाच्या दर्जाकडे नगरपरिषद प्रशासन फारशा गांभीर्याने पाहत नाही, परिणामतः “आंधळं दळते आणि कुत्रे पीठ खाते” अशी अवस्था निर्माण झाली आहे. काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप असल्याची वाच्यता केली जात आहे. मात्र काही असले तरी कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यामुळे बनवण्यात आलेल्या नाल्या लगेच पाला पाचोळ्या गत पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागल्या आहेत. अशीच दुर्दैवी अवस्था उदगीर शहरातील गणेश विसर्जनाची विहीर ते तात्काळ हनुमान मंदिर या दरम्यानचा रस्ताही पूर्णपणे खचला आहे. एका बाजूने हळूहळू तोही नालीच्या कठड्यासोबतच झीजस झिजत वाहत जातो आहे, अशा प्रकारामुळे अपघाताला निमंत्रण दिले जाऊ शकते. याचे गांभीर्य नगरपरिषद प्रशासनाने ठेवणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता सध्या नगरपालिकेला प्रशासक असल्यामुळे आणि त्यांच्याकडे हा अतिरिक्त भार असल्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजासाठी त्यांना फारसा वेळ मिळत असेल असे वाटत नाही. त्यामुळे नवीन विकास कामांना मंजुरी देणे, बिले काढणे आणि पुढार्यांची हुजरेगिरी करणे अशी महत्त्वाची कामे वाढलेली आहेत. परिणामतः सर्वसामान्य माणसाला तारेवरची कसरत करत वावर करावा लागतो आहे. अशीच अवस्था पेठ दरवाजासमोरील मोठ्या नालीची झालेली आहे. या दोन्ही नाली आणि रस्त्याचे काम वार्ड क्रमांक एक व आठ मधील आहेत.आता हे काम कधी झाले? कोणी केले? याची चौकशी किंवा या निकृष्ट कामाच्या संदर्भात विचारणा करण्याऐवजी पुन्हा या कामासाठी निधी मंजूर करावा, म्हणून कार्यकर्त्यांनी धावपळ सुरू केल्याची चर्चा गल्लीबोळात सुरू आहे. परिणामतः शासनाचा आलेला निधी हा अशा पद्धतीने खड्ड्यात जात असेल तर “विकास गेला खड्ड्यात” अशी म्हणायची दुर्दैवी वेळ उदगीरच्या जनतेवर येऊ लागली आहे. या गोष्टीचे गांभीर्य प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. या नाली आणि रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय टाळावी. अशी ही मागणी जनतेतून होत आहे.
