जनतेचे प्रेमच सामाजिक जाणिवा जपायला लावते – डॉ. दीपक सोमवंशी

0
जनतेचे प्रेमच सामाजिक जाणिवा जपायला लावते - डॉ. दीपक सोमवंशी

जनतेचे प्रेमच सामाजिक जाणिवा जपायला लावते - डॉ. दीपक सोमवंशी

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर शहरच नव्हे तर संपूर्ण परिसरातील लोक व्यवसाय करणाऱ्या लोकांवर जीवापाड प्रेम करतात. आपुलकी आणि जिव्हाळा दाखवतात. त्यामुळे या ठिकाणी काम करत असताना सामाजिक ऋणानुबंध निर्माण होतात. परिणामतः कोणीही अधिकारी, कर्मचारी हे या मातीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. उदगीरकरांचे प्रेम या परिसरातील डॉक्टरांना सामाजिक भान ठेवून रुग्णसेवा करायला भाग पाडते. असे विचार उदगीर येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा ख्यातनाम डॉक्टर दीपक सोमवंशी आणि डॉक्टर ज्योती सोमवंशी यांनी व्यक्त केले. ते डॉक्टर्स डे च्या निमित्ताने जिव्हाळा ग्रुप च्या वतीने आयोजित सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांच्या सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
उदगीर येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने शिक्षण तज्ञ देविदासराव नादरगे यांच्या अध्यक्षतेखाली तर राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे, पांडुरंग बोडके, रमाकांत बनशेळकीकर, विश्वनाथ माळेवाडीकर, दशरथ शिंदे, अशोकराव बिरादार, व्यंकट नेत्रगावकर, सुधाकर जवळगेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उदगीर येथील दीपज्योती नेत्र रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. ज्योतीताई सोमवंशी, बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून रुग्ण सेवा करणारे डॉ. दीपक सोमवंशी, उदयगिरी मल्टी स्पेशालिटी चे संस्थापक डॉ. माधव चंबुले, डॉ. लक्ष्मण ढोकाडे, डॉ. रमण रेड्डी, डॉ. जैद हमजा, डॉ. महेश भातंबरे, डॉ. प्रवीण माने, डॉ. संजीवनी भातंबरे इत्यादी तज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आदर्श शिक्षक विश्वनाथ मुडपे यांनी सांगितले की, उदगीर शहरात अद्यावत सुख सुविधा उपलब्ध कराव्यात, या उद्देशाने डॉ माधवराव चंबुले यांनी उदयगिरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करून उदगीरकरांची सेवा सुरू केली आहे. माणुसकीची जाण ठेवून ते काम करतात. तशाच पद्धतीने बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉ. दीपक सोमवंशी आणि डॉ. ज्योतीताई सोमवंशी या ख्यातनाम आहेत, विद्वान आणि आपल्या क्षेत्रात त्यांचा हातखंडा आहे, तरी देखील “गरीबों का मसीहा” म्हणून ओळखले जातात. मोठ्या शहरात गेले असते तर करोडो रुपये यांनी कमावले असते, मात्र आपल्या ग्रामीण भागात जनतेला चांगली सेवा देता यावी. या उद्देशाने त्यांनी उदगीर मध्येच राहून काम करणे सुरू केले आहे. हे उदगीरकरांचे भाग्य आहे असे सांगितले.
पुढे बोलताना डॉ. ज्योतीताई सोमवंशी यांनी सांगितले की, गेल्या 25 वर्षापासून या भागामध्ये बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उत्कृष्ट काम केले जात आहे. आपल्या हातून आजपर्यंत 50 हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया माफक किमतीमध्ये झाल्या आहेत. अंधांना दृष्टी देणे हे पुण्याचे काम आहे. या कामामुळे समाधान भेटते. या भागातील लोकांची सेवा करता आली याचा मनस्वी आनंद आहे. जणू आपल्या माहेरच्या मंडळीची सेवा करतेय, असा भाव मनात राहतो. त्यामुळे रुग्णसेवेमध्ये आनंद येतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मारुतीराव रोडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोपानराव माने, डॉ. प्राजक्ता कलंबरकर, पांडुरंग बोडके, वैजनाथ पंचगल्ले, हावगीराव आचार्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!