ना. बनसोडे यांचा वाढदिवस : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जल्लोष!! आ. अमित देशमुख त्यांचा अवमान करणारा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेसमध्ये आक्रोश !!

0
ना. बनसोडे यांचा वाढदिवस : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जल्लोष!! आ. अमित देशमुख त्यांचा अवमान करणारा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेसमध्ये आक्रोश !!

ना. बनसोडे यांचा वाढदिवस : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जल्लोष!! आ. अमित देशमुख त्यांचा अवमान करणारा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेसमध्ये आक्रोश !!

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उदगीर शहरात दिवसभर अनेक कार्यक्रम ठेवले होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ना. संजय बनसोडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रॅली काढून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या घोषणा दिल्या. याच घोषणा पैकी एक घोषणा “कोण आला रे कोण आला?”… अशी होती. या घोषणेच्या प्रत्युत्तर दाखल कार्यकर्त्यांनी “अमित भैय्या चा बाप आला” असे म्हटले असल्याचा आरोप एका व्हायरल झालेल्या व्हिडिओ करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा करणे काही गैर नव्हते, मात्र घोषणाबाजी करत असताना उदगीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय आदर्श सांस्कृतिकचा वारसा जपणे गरजेचे आहे, असे असताना देखील काही चुकीच्या घोषणा जर दिल्या गेल्या असतील तर, ते अत्यंत चुकीचे आहे.
समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या घोषणा दिल्या गेल्या असे सांगितले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही राजकीय पक्षांनी कोणत्याही राजकीय नेत्यावर चिखल फेक करणे, किंवा त्यांची बेअदबी करणे टाळणे अपेक्षित असते. मात्र उदगीर विधानसभा मतदारसंघात या समाज माध्यमावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने चांगलाच गदारोळ माजवला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंच या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येत मोट बांधली आहे. आ. अमित भैया चा अवमान झाला म्हणून या जल्लोषाचा आणि दिलेल्या घोषणांचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान या रॅलीमध्ये दिलेली घोषणा तशी नव्हतीच, त्या रॅलीच्या व्हिडिओला छेडछाड करून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणाऱ्या वर कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भोळे, शशिकांत बनसोडे, चंद्रशेखर पाटील, मदन पाटील, शेख फैयाज, सय्यद जानीमिया, अनिल मुदाळे इत्यादी कार्यकर्त्यांनी शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन चुकीचा व्हिडिओ व्हायरल करून वातावरण प्रदूषित करणाऱ्या विरुद्ध योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.
दुसऱ्या बाजूला संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाकडून रॅलीमध्ये दिल्या गेलेल्या घोषणांचा निषेध नोंदवत आंदोलनात्मक पवित्रा घेतला गेला आहे. यामध्ये उदगीर, वाढवणा, हळी हंडरगुळी, जळकोट या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रखरपणे राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणा देत विरोध नोंदवला आहे.
या संदर्भात राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निवृत्ती सांगवे यांनी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार केली असून ज्यांनी कोणी बदनामी केली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. सदरील तक्रार देताना उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव तथा माजी नगराध्यक्ष उषा कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूर खान पठाण, विधिज्ञ पद्माकर उगिले, युवक काँग्रेसचे श्रीनिवास एकुर्केकर ,बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, गौतम पिंपरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट, राष्ट्रीय दलित अधिकार मंच चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट…….
उदगीरच्या सांस्कृतिक परंपरेला काळीमा फासणारा दिवस…

उदगीर तालुका हा सुसंस्कृत परंपरा जपणारा तालुका आहे. राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या विचारधारा जरी असल्या तरी देखील खालच्या पातळीवर येऊन कोणीही कधीही अपप्रचार केला नाही, किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्याची अशा पद्धतीने खालच्या थरावरून बदनामी केली नाही. मात्र सत्तेने उन्मत होऊन अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या असतील तर ते निश्चितच उदगीरच्या आदर्श संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे, आणि या घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत.

कल्याण पाटील,
तालुकाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उदगीर.

चौकट…..

सत्तेची मस्ती चालणार नाही…..

उदगीर हे संत, महंत, मौलवी यांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. या ठिकाणी कोणीही आपल्या पदाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करू नये. किंवा सत्तेची मस्ती दाखवून इतरांना त्रास ही देऊ नये. आमच्या नेत्यांचा अवमान खपवून घेणार नाही. आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते, मात्र आम्ही सुसंस्कृत आहोत. त्यामुळे संयम ठेवून सनदशीर मार्गाने निषेध नोंदवत आहोत.

निवृत्ती सांगवे,
प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय दलित अधिकार मंच,
प्रदेश उपाध्यक्ष भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र.

चौकट…..
आ गा जे घडीलेच नाही……

उदगीर विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गलगा सुरू केला आहे. मात्र वास्तविक पाहता तशा पद्धतीच्या कोणत्याही घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी दिलेल्या नाहीत. आम्हाला देखील महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या बद्दल आदर आहे. त्यामुळे आम्ही तशा घोषणा देणे शक्य नाही. केवळ राजकीय स्टंट करण्यासाठी अशा पद्धतीच्या छेडछाड केलेल्या व्हिडिओला व्हायरल करून आमच्या नेत्याची बदनामी केली जात आहे. एक सामान्य कार्यकर्ता मंत्री झाला आहे, हेही अनेकांची पोटदुखी ठरली आहे. कदाचित त्यातूनच असे प्रकार घडत असावेत. ज्यांनी कोणी चुकीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी.

प्रवीण भोळे,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर विधानसभा मतदारसंघ.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!