अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ते उर्ध्व मानार प्रकल्पाच्या सर्वेक्षण कामास अखेर मंजुरी; आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांना यश !
अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ते उर्ध्व मानार प्रकल्पाच्या सर्वेक्षण कामास अखेर मंजुरी; आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांना यश !
अहमदपूर (गोविंद काळे) : जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ते उर्ध्व मानार प्रकल्प आणि प्रस्तावित झरी साठवण तलाव उपसा सिंचन योजनेकरिता सर्वेक्षण व अन्वेषणाच्या कामास मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प आ. बाबासाहेब पाटील यांच्या विशेष पुढाकाराने पुढे आला असून सर्व शेतकरी बांधव व मतदारसंघामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.
गोदावरी महामंडळाने 13 डिसेंबर 2023 च्या पत्रानुसार अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ते उर्ध्व मानार प्रकल्प आणि उर्ध्व मानार प्रकल्प ते प्रस्तावित झरी साठवण तलाव या उपसा सिंचन योजनेकरिता 50 दलघमी पाणी वापरण्यास मान्यता दिली आहे. या योजनेद्वारे उर्ध्व मानार प्रकल्पात आणि उपसा योजनेद्वारे प्रस्तावित झरी साठवण तलावात 50 दलघमी पाणी साठवून, अहमदपूर आणि चाकूर तालुक्यांतील 30-35 गावांतील अंदाजे 8000 हेक्टर क्षेत्र बंद पाईपलाईनद्वारे सिंचित केले जाईल. तसेच 5 दलघमी पाणी पिण्याकरिता नियोजित आहे. सध्याच्या स्थितीत सर्वेक्षणाचे काम सुरू असून, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवालास शासनाची मंजुरी घेऊन काम सुरू करण्यात येईल. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 4000 कोटी रुपये आहे.
या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी आ. बाबासाहेब पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून या महत्वाच्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला. या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.
या योजनेच्या मान्यतेसाठी मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले याबद्दल आ. बाबासाहेब पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक तिरमनवार साहेब, मुख्य अभियंता घोगरे साहेब, अधिक्षक अभियंता चिश्ती साहेब, कार्यकारी अभियंता काळे साहेब, स. अ. श्रेणी 1 चे कसबे साहेब, उपविभागीय अधिकारी मंडलापुरे साहेब, क. अ. सुशांत शिंदे आणि कटकमवार, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रमोद शिंदे यांनी पाणी उपलब्धता आणि सर्वेक्षण प्रस्तावासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांचे देखील आ. पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.
कोट:
“अहमदपूर – चाकूर मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी जलसमृद्ध होईल. या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची कोणतीही समस्या राहणार नाही. जलसंपन्नता हाच शेतकऱ्यांच्या विकासाचा मूलमंत्र आहे आणि मी यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. तसेच मतदारसंघातील जलसंपदा व जलसंधारणाचे अन्य प्रकल्प देखील लवकरच पूर्ण होतील यासाठी देखील मी सातत्याने प्रयत्नशील आहे.”
