उदगीरच्या सुसंस्कृत राजकारणात विष कालवू नका – नागराळकर
उदगीरच्या सुसंस्कृत राजकारणात विष कालवू नका - नागराळकर
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर ही संत, महंतांची भूमी आहे. या भूमीमध्ये आदर्श राजकारणी संस्कृती आहे. मात्र त्या संस्कृतीला विकृत करण्याचे पाप गेल्या काही दिवसात सुरू झाले आहे. हे दुर्दैव आहे, आदर्श संस्कृतीमध्ये विष कालवण्याचे पाप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाया कराव्यात. अशी आमची मागणी होती, मात्र राजकीय दबावापोटी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याचे पाप प्रशासनाने केले आहे. हे सर्व गुन्हे रद्द करावेत, आणि लातूर जिल्ह्याचे आदर्श नेतृत्व भारताला नवी दिशा देणारे स्वर्गीय विलासराव देशमुख यांची बदनामी करणाऱ्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनी केली आहे.
ते उदगीर येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित रस्तारोको आंदोलना नंतर बोलत होते.
याप्रसंगी माजी आ. शिवराज तोंडचिरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश चिटणीस प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे, जिल्हाध्यक्ष संजय शेटे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, श्रीमंत सोनाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव उषा कांबळे, जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष शीलाताई पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले,राष्ट्रवादी काँग्रेसचे अजीम दाईमी, गजानन सताळकर, विधिज्ञ प्रभाकर काळे, ज्ञानोबा गोडभरले, बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, सरोजा बिरादार, मारुती पांडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना बसवराज पाटील नागराळकर यांनी स्पष्ट केले की, सत्ता येते आणि जाते. मात्र माणसाने तत्वाला प्राधान्य देऊन जगले पाहिजेत. समाजवादी विचारधारेला कोलदांडा घालून जातियवादी विचार धारेला स्वीकारले, त्याच वेळेस संजय बनसोडे यांनी उदगीरच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्यानी सामाजिक जाणीव जपाव्यात. अशाही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी विधीज्ञ पद्माकर उगिले यांनी प्रास्ताविक करताना महायुतीचे कार्यकर्ते वैचारिक पातळी सोडून खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत, याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, तत्त्वाच्या गोष्टी असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी करत आहेत. मूळ मुद्द्याला सोडून इतरत्र भरकटच आहेत. ज्या विकासाच्या ते गप्पा करत आहेत त्या संदर्भातला उहापोह आचारसंहिता लागल्यानंतर आम्ही जनतेसमोर मांडू, असे सांगितले. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली, आमदार अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला विकासाची दिशा दिली. त्यांचा बाप होण्याची स्वप्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पडू लागली आहेत, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. कोणाचा बाप काढून राजकारण करण्याची उदगीरची परंपरा नव्हती, ती नवीन परंपरा या विकृत राजकारणी लोकांनी सुरू केली आहे. याबद्दल स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे यांनी आपल्या भाषणातून या निष्क्रिय आणि सर्वच आघाड्यावर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारची एकूण वाटचालच चुकीची चालू आहे. सर्वसामान्य माणसावर दबाव टाकण्यासाठी तानाशाही सुरू आहे. न्याय एकीकडे आणि विकासाच्या गप्पा एकीकडे असा प्रकार सुरू आहे. हे सर्व थांबले पाहिजे, अशी मागणी केली. याप्रसंगी शीला पाटील, उषाताई कांबळे, विधिज्ञ प्रभाकर काळे, यांनीही मनोगत व्यक्त केले.
चौकट…..
आंदोलन चिरडण्याचा पोलिसांचा अयशस्वी प्रयत्न….
महाविकास आघाडीच्या शांततेने चाललेल्या आंदोलनाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या वतीने केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलनासाठी बसलेल्या कार्यकर्त्याला उठउन लावून वाहनांना रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी केला. मात्र आंदोलन करणारे कार्यकर्ते आक्रमक होताच पुन्हा पोलिसांनी पडती बाजू घेतली. त्यामुळे अनर्थ टळला.
चौकट……
तब्बल अडीच तास रास्ता रोको……
उदगीर शहराच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चारह रस्त्यावरून येणारी वाहतूक ठप्प करण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला होता. मात्र तत्पूर्वीच पोलीस प्रशासनाने अनेक ठिकाणावरून पर्यायी मार्ग काढून दिले होते. त्यामुळे वाहनांना फारशी अडचण जाणवली नाही. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते या सर्वांनी या रस्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान मनोगत व्यक्त करताना भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या सरकारवर खडसावून टीका केली.
चौकट…..
आंदोलकाचे सौजन्य……
आंदोलन चालू असतानाच अचानक रुग्णवाहिका येताच तातडीने आंदोलन बाजूला झाले, आणि रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. जणू आंदोलकांनी घेतलेली ही भूमिका पोलिसांच्या आक्रमक भूमिकेला चपराकच म्हणावी लागेल. अत्यंत शांततेने आणि सौजन्यशील पणे आंदोलन यशस्वी झाले, पोलिसांनी हस्तक्षेप केलेला गालबोट वगळता शांततेमध्ये रस्ता रोको संपन्न झाला.
