भारतीय ज्ञान प्रणालीला प्राचीन कवींसह कालिदासांच्या साहित्याला विशेष महत्त्व – डॉ. दुर्गादास चौधरी
भारतीय ज्ञान प्रणालीला प्राचीन कवींसह कालिदासांच्या साहित्याला विशेष महत्त्व - डॉ. दुर्गादास चौधरी
अहमदपूर (गोविंद काळे) : नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुकतेच लागू झाले असून यात भारतीय ज्ञान प्रणाली अंतर्गत भारतीय प्राचीन कवींसह महाकवी कालिदास यांच्या साहित्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे असे प्रतिपादन उपप्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील संस्कृत व आयक्यूएसी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कालिदास जयंती कार्यक्रमा’च्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना डॉ. चौधरी म्हणाले की, महाकवी कालिदासाच्या साहित्यामध्ये निसर्गाच्या विविध छटांचे चित्रण पहावयास मिळते. तसेच कालिदासाचे साहित्य आज ही प्रासंगिक आहे, असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महाकवी कालिदास यांनी संस्कृत साहित्याला जागतिक स्वरूप प्राप्त करून दिले. तसेच निसर्ग आणि मानवी रंगाचे अंतरंग शोधणारा महाकवी म्हणजे कालिदास होय, असे ही ते म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे संयोजक तथा संस्कृत विभाग प्रमुख तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रशांत बिरादार यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व बहुसंख्येने उपस्थित होते.
