लातूरने शैक्षणिक पॅटर्न उभा केला, उदगीरणे ग्राम विकासाचा पॅटर्न उभारावा – सुभाष तांबोळी

0
लातूरने शैक्षणिक पॅटर्न उभा केला, उदगीरणे ग्राम विकासाचा पॅटर्न उभारावा - सुभाष तांबोळी

लातूरने शैक्षणिक पॅटर्न उभा केला, उदगीरणे ग्राम विकासाचा पॅटर्न उभारावा - सुभाष तांबोळी

उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्याने जसा शैक्षणिक पॅटर्न निर्माण केला आहे तसा आता उदगीर तालुक्याने ग्रामीण विकासाचा पॅटर्न निर्माण करावा आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा या तिन्ही राज्यावर एक वेगळा ठसा उमटवावा. असे आवाहन अफार्मचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी यांनी केले.
ते उदगीर तालुक्यातील निवडक 15 गावांसाठी सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्प उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. एचडीएफसी बँक च्या आर्थिक सहकार्याने आणि अफार्म पुणे मार्फत संचलित सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम प्रकल्पाचे उद्घाटन उदगीर येथील कृष्णाई मंगल कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाले.
या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रमोद पाटील, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक योगेश पगारे, एचडीएफसी बँकेच्या उदगीर शाखेचे ज्ञानेश्वर मुटकुळे, पशुधन विकास अधिकारी उदगीर डॉ. विजय घोनशीकर, मंडल कृषी अधिकारी राजेश मुळजे, आत्मा विभागाचे नितीन दूरुगकर अफार्मचे सचिव एच.पी. देशमुख,अफार्मचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अफार्म तांबोळी म्हणाले की, ज्या पद्धतीने लातूरने शैक्षणिक पॅटर्न निर्माण केला आहे, तसाच उदगीरच्या या 15 गावांनी ग्राम विकासाचा पॅटर्न निर्माण करून मोठे उद्योग व्यवसाय उभे करावेत, यासाठी अफार्म च्या माध्यमातून सहकार्य केले जाते. अफार्म कंपनीने कमावलेला नफा लोककल्याणाच्या तथा ग्रामीण जनतेच्या विकासासाठी खर्च करण्याचा विचार करून परिवर्तन हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी नवे नवे प्रकल्प राबवणे, शेतकऱ्यांच्या संस्था निर्माण करणे, आणि या संस्थांच्या मार्फत प्रत्यक्ष कार्यक्रम राबवणे. असे प्रकल्प राबवले जात आहेत. उदगीर येथील बेनीनाथ कंपनीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत, ही गौरवाची बाब आहे असे सांगितले.
पशुधन अधिकारी डॉ. घोणशीकर यांनी याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची तुलना करून मराठवाड्याने देखील पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे शेती पूरक इतर उद्योगधंदे सुरू करावेत, तसेच जोडधंद्यांना प्राधान्य द्यावे. असे आवाहन केले, दूध उत्पादक सोबतच शेळी पालन, कुक्कुटपालन यासाठी ही शासनाकडून अर्थसहाय्य केले जाते, त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली.
नितीन दूरुगकर यांनी आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवले जाऊ शकतील? या संदर्भात केलेल्या विविध कामाची माहिती दिली. तसेच कृषी विषयक मार्गदर्शनाच्या अनुषंगाने आत्मा सर्वांना सहकार्य करते. शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्याचे काम आत्माच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकांमधून अ फार्मचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी यांनी अफार्मची एकूण कार्यप्रणाली सांगितली. सध्या अफार्मच्या माध्यमातून शेतकरी ग्रामीण विकास या विषयाला प्राधान्य देऊन विविध कार्यक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. परिवर्तन प्रकल्पाचे उद्दिष्टे आणि घटकाबाबत जनजागृती करण्यासाठी अशा प्रकल्पांचे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचेही सांगितले. नैसर्गिक संसाधन, व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, कौशल्य प्रशिक्षण आणि उपजीविकावर्धन या गोष्टींना प्राधान्य देऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून डाळ मिल युनिट तसेच फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकच शेतकरी उत्पादक कंपनीला मजबूत करणे, याचा प्रमुख सहभागातून कार्यक्रम राबवणे हे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी उदगीर तालुक्यातील 15 गावांमधील जवळपास 280 नागरिक, शेतकऱ्यांचा तसेच महिला शेतकरी वर्गाचा सहभाग होता. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्नही याप्रसंगी सोडवण्यासाठी मार्गदर्शन झाले. कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन हंसराज मोमले यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र इंगळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!