‘मैत्री’ प्रशिक्षणांमधून कौशल्यवृद्धीसह पशुपालक आणि तरुणांची आर्थिक उन्नती शक्य – डॉ. अनिल भिकाने

0
'मैत्री' प्रशिक्षणांमधून कौशल्यवृद्धीसह पशुपालक आणि तरुणांची आर्थिक उन्नती शक्य - डॉ. अनिल भिकाने

'मैत्री' प्रशिक्षणांमधून कौशल्यवृद्धीसह पशुपालक आणि तरुणांची आर्थिक उन्नती शक्य - डॉ. अनिल भिकाने

उदगीर (एल.पी.उगीले) : ‘मैत्री’ प्रशिक्षणांमधून कौशल्यवृद्धी करुन पशुपालकाचे उत्पन्न वाढ आणि तरुणांना नवीन व्यवसाय संधी शक्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे संचालक, विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने यांनी केले. ते ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर; पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पशुप्रजनन व स्त्रीरोगशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे आयोजित ‘ग्रामीण भारतासाठी बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ’ ( मैत्री) प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलत होते. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.नंदकुमार गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.अशोक देवगंरे आणि डॉ. अनिल पाटील, प्रकल्प सह-समन्वयक उपस्थित होते.
डॉ.अनिल पाटील यांनी प्रास्ताविका मध्ये २३ जुलै २०२४ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. सदर प्रशिक्षण कार्यक्रमातून कृत्रिम रेतन विषयक जास्तीत जास्त ज्ञान घेवूून त्याचा पशुधनातील गर्भधारणा दर वाढवण्यासाठी वापर करावा, असे मत डाॅ.नंदकुमार गायकवाड यांनी व्यक्त केले. आपल्या मार्गदर्शनात पुढे डॉ. अनिल भिकाने यांंनी तरुणांनी दुधाळ जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करून शुद्ध वंशावळी व अधिक दूध देणारे पशुधन निर्माण करण्यासाठी कुशल व तांत्रिक मनुष्यबळ तयार करणे, हे या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तसेच प्रशिक्षण कालावधीत कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाबरोबरच पशुपालन व्यवस्थापनाबाबत जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करून पशुपालकांच्या उत्थानाबरोबरच स्वतःचा आर्थिक विकास साधावा, असे प्रतिपादन केले. या प्रशिक्षणामध्ये नांदेड व धाराशीव जिल्ह्यातील ३० सुशिक्षित बेरोजगार तरुण सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण सहसमन्वयक डॉ.प्रफुल्लकुमार पाटील तर आभार प्रदर्शन डॉ. स्नेहल रामटेके यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!