गोर बंजारा समाजाच्या आरक्षणावर संकट आल्यास शासनाला परिणाम भोगावे लागतील – जयपाल राठोड

0
गोर बंजारा समाजाच्या आरक्षणावर संकट आल्यास शासनाला परिणाम भोगावे लागतील - जयपाल राठोड

गोर बंजारा समाजाच्या आरक्षणावर संकट आल्यास शासनाला परिणाम भोगावे लागतील - जयपाल राठोड

उदगीर (एल पी उगिले) : महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजास प्राप्त असलेल्या आरक्षणावर संकट आलेले आहे. या आरक्षणामध्ये इतर जाती घुसू लागल्या आहेत. परिणामतः ज्या जातीसाठी आरक्षण आहे ते अडचणीत येऊ लागले आहेत. याचे गांभीर्य राज्यकर्त्यांनी बाळगावे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. बंजारा समाजाच्या भरवशावर निवडून जाणाऱ्या 65 आमदारांना पराभवाचा धक्का बसू शकेल असा इशारा बंजारा गोरसेनेचे उदगीर तालुका उपाध्यक्ष जयपाल राठोड यांनी दिला आहे.
विमुक्त जाती अ प्रवर्गामध्ये राजपूत भामटा या अत्यल्प लोकसंख्या असलेल्या जातीचा समावेश असून नाम साधर्म्य चा फायदा घेत सवर्ण राजपूत, मीना, छप्परबंद या खुल्या प्रवर्गातील लोक देखील खुलेआम विमुक्त जाती अ प्रवर्गामध्ये घुसखोरी करत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने भटक्या असलेल्या जातीला त्रास होत आहे. अनेक ठिकाणी भामटा शब्द लावून लोक भामटेगिरी करत असल्यामुळे मूळ विमुक्त जाती अ प्रवर्गातील 14 तत्सम जाती आरक्षणाचे फायदे घेण्यास हतबल ठरू लागले आहेत. या संदर्भात गोर सेनेच्या वतीने 2019 पासून वेळोवेळी आंदोलन करून शासनाला या संदर्भात जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. गौर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देश पातळीवर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राज्यातही आंदोलन झाले. आता तर जिल्हा आणि तालुका पातळीवर आंदोलन होऊ लागले आहेत. मध्यंतरी विधिमंडळात एसआयटी नेमण्याची घोषणा बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली होती, मात्र लगेच ती घोषणा चुकून झाली असल्याचे सांगत एस आय टी नेमण्याची तयारी दाखवणाऱ्या सरकारने चक्क पाठ फिरवली आहे. इतकेच नाही तर बंजारा समाजाच्या जन आक्रोश मोर्चाकडेही मंत्र्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. पुसद येथे 14 दिवस आमरण उपोषण करणाऱ्या दिनकर राठोड या गोरबंजारा युवकाची ही दखल शासन घ्यायला तयार नाही. ही गोष्ट आता बंजारा समाजाच्या लक्षात येऊ लागली आहे. बंजारा समाजाच्या मतावर डोळा ठेवून राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवण्याची तयारी गोर बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी केली आहे. राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी बंजारा समाजाचे निर्णायक मतदान आहे, त्या ठिकाणी अग्रक्रमाने समाज आक्रमक होणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपले अस्तित्व दाखवल्याशिवाय राहणार नाही. या अनुषंगाने आपल्या मागील कित्येक दिवसापासून चालू असलेल्या अनेक मागण्यांचे निवेदन महसूल प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. अशी माहिती गोरसेना उदगीर तालुका उपाध्यक्ष जयपाल राठोड यांनी दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!