स्वातंत्र्य लढ्यात आर्य समाजाची भरीव कामगिरी – डॉ. धर्मेंद्र कुमार शास्त्री

0
स्वातंत्र्य लढ्यात आर्य समाजाची भरीव कामगिरी - डॉ. धर्मेंद्र कुमार शास्त्री

स्वातंत्र्य लढ्यात आर्य समाजाची भरीव कामगिरी - डॉ. धर्मेंद्र कुमार शास्त्री

महात्मा फुले महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर नवचेतना व्याख्यान संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांनी जातीविरहित समाज रचनेची चळवळ संपूर्ण भारतभर सुरू केली. त्या बरोबरच स्वातंत्र्य लढ्यातही आर्य समाजाने बजावलेली कामगिरी ही भरीव व नेत्रदीपक आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील खालसा महाविद्यालयातील संस्कृतचे विभाग प्रमुख व संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ. धर्मेंद्र कुमार शास्त्री यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि संस्कृत विभागाच्या वतीने आयोजित ‘नवीन शैक्षणिक धोरण नवचेतना’ कार्यक्रमात उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शास्त्री बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. सुनीता शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. धर्मेंद्र शास्त्री म्हणाले, की आर्य समाजामुळे भारतीय समाजात शांतता आणि सुख समृद्धीचे वातावरण निर्माण झाले. मराठवाड्यात आर्य समाजाच्या चळवळीचा मोठा प्रभाव असून, हैदराबाद मुक्तिसंग्रामातही आर्य समाजाचे महत्त्वाचे योगदान होते, असे ते यावेळी म्हणाले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी निराश न होता आठ तास अभ्यास करावा.मोबाइल दूर ठेवावे तसेच टी.व्ही. बंद ठेवावा आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना सुप्रसिद्ध लेखक तथा समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, भारतीय ज्ञानाची परंपरा मोठी असून, या परंपरेतील महर्षी दयानंद सरस्वती आणि त्यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचे योगदान मोठे आहे. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या ‘ सत्यार्थ प्रकाश’ हा ग्रंथ सामाजिक व व्यावहारिक ज्ञानाने सिद्ध झालेला असून, या ग्रंथात जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतात. सर्व विद्यार्थ्यांनी या ग्रंथाचे वाचन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून भारतीय ज्ञान परंपरांचे जतन होईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘ असूड’ वार्षिक विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह. भ.प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले. प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले तर आभार प्रदर्शन इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. किरण गुट्टे यांनी केले. यावेळी महादेवातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!