लाडकी बहीण योजनेसाठी आ . धीरज देशमुख यांचा निर्णय गौरवास्पद – विवेक जाधव
लाडकी बहीण योजनेसाठी आ . धीरज देशमुख यांचा निर्णय गौरवास्पद - विवेक जाधव
उदगीर (एल.पी. उगिले) : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. राज्यभर सरकारने चालू केलेल्या या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिला अर्ज प्रक्रिया करत आहेत. या योजनेसाठी जवळपास प्रत्येक महिलेला बँकेत नवीन खाते चालू करण्याची गरज आहे, आणि बँकेत खाते उघडण्यासाठी किमान पाचशे ते हजार रुपये भरावे लागू शकतात. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ.धीरज देशमुख यांनी या योजनेसाठी जिल्हाभरात लातूरच्या माता भगिनींसाठी शून्य रुपयात खाते चालू करण्याचा एक आदर्श उपक्रम सुरू केला आहे. सर्वसामान्य नागरिकांतून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे. त्यांच्या या आदर्श धोरणात्मक निर्णयमुळे लातूर जिल्हा बँक लोकप्रिय तर ठरलीच आहे. त्याचबरोबर कित्येक महिलांना मदतीचा हात देणारी बँक ठरली आहे, असे विचार विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक महिलेला खाते उघडण्यासाठी खर्च करावी लागणारी रक्कम बचत झालेलीच आहे. त्यासोबतच बँकेमार्फतही अर्ज भरण्याच्या संदर्भात सहकार्य केले जात आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आर्थिक अडचणीच्या संदर्भात अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून लोकहिताचा निर्णय आ. धीरज देशमुख यांनी घेतल्यामुळे किमान 50 हजार महिलांनी जरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडले तर जिल्ह्यातील पाच कोटी रुपयांची महिलांची बचत होऊ शकेल. अशी प्रतिक्रिया ही उदगीर तालुक्यातील गंगापूर विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे युवा चेअरमन विवेक जाधव यांनी दिली आहे.
