भाजप सोडलेल्या कोणत्याही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला जनताच धडा शिकवेल – दिलीपराव देशमुख मालक
भाजप सोडलेल्या कोणत्याही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला जनताच धडा शिकवेल - दिलीपराव देशमुख मालक
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर – जळकोट विधानसभा मतदारसंघ हा कायम भाजपाचा बालेकिल्ला असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत परिश्रम करुन हा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात ठेवला आहे. पक्षात राहून सतत पदे उपभोगलेली स्वार्थी प्रवृत्तीची माणसे भाजपपासून दूर गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. ज्या लोकांनी पक्ष सोडला त्यांना जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत. असे रोखठोक विचार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना शिवानंद हैबतपुरे म्हणाले की, गत पंचवीस वर्षापासून या मतदारसंघात भाजपा विचाराची पेरणी असंख्य निस्वार्थ अशा कार्यकर्त्यांनी केली म्हणूनच भाजपाने या मतदारसंघात वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत कोणी पक्ष सोडून गेले असले तरी भाजपा कार्यकर्ते हे कायम पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहातील. असा विश्वास भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे यांनी व्यक्त केले.
उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलताना हैबतपूरे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा व्यक्तीकेंद्रित पक्ष नसून तत्वकेंद्रित पक्ष आहे. भारतीय संविधानाचे जतन करण्यासाठी व बलशाली राष्ट्र निर्माणासाठी भाजपाला सतत संघर्ष करत रहावे लागले आहे. संघर्ष हा भाजपाच्या वाट्याला नेहमीच आला आहे. आणि हा संघर्ष करुनच कार्यकर्त्यांनी जनमताचा विश्वास प्राप्त केला आहे. भाजपाने अनेक सामान्य कार्यकर्ते मोठे केले, छोट्या छोट्या जातीसमूहांसाठी काम केले. अनेकांना न्याय दिला, पण काही लोक याची जाणीव न ठेवता पक्षाला सोडून गेले.
असं असले तरी भाजपा कायम एकसंध राहिला. गत लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधीची सभा होऊनही भाजपाने उदगीर-जळकोट मध्ये मताधिक्य घेतले हे लक्षात घेणे आवश्यक आहे. भाजपा नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. म्हणूनच उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघात कोणाच्या जाण्याने भाजपावर कुठलाही परिणाम होणार नसून मतदारसंघातील जनता आणि कार्यकर्ते हे भाजपा सोबत ठामपणे उभे असल्याचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे यांनी सांगितले.
या बैठकीला उपस्थित आपल्या पुढे बोलताना भाजपा जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक म्हणाले की, भाजपा ने ज्यांना दोनवेळा आमदार केले, त्यांनी याची जाणीव न ठेवता पक्षांतर केले. याची मतदार नक्कीच नोंद घेऊन त्यांना त्यांची जागा जनता दाखवून दिल्याशिवाय रहाणार नसल्याचे जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी सांगितले.
भाजपा नेते माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले की, उदगीर भाजपा ही एकसंघ असून भाजपाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला या उदगीर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. उदगीरच्या विकासासाठी भाजपाने आपला सिंहाचा वाटा उचलला आहे. याची आम्हाला जाणीव असून आम्ही भाजपाशी एकनिष्ठ आहोत.
उदगीर तालुका अध्यक्ष शिवशंकर धुप्पे म्हणाले की, तालुक्यातील भाजपा ही कायम तत्वावर चालली आहे. ती माणसाशी नसून विचाराशी बांधिल आहे. तालुक्यातील चारदोन लाभार्थी गेले असले तरी निष्ठावान लोकांची फळी ही भाजपा सोबत आहे.
भाजपा उदगीर शहराध्यक्ष मनोज पुदाले,लातूर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमोल निडवदे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.
