मटका जुगार बंद करा अन्यथा अधिकृत परवाने द्या – संजय राठोड
मटका जुगार बंद करा अन्यथा अधिकृत परवाने द्या - संजय राठोड
उदगीर (एल पी उगीले) : लातूर जिल्ह्याला पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे असताना अवैध धंदे पूर्णपणे बंद झाले होते. मात्र आता पुन्हा अवैध धंद्यांनी डोक्यावर काढले आहे. आ. बच्चुभाऊ कडू यांनी तर ऑनलाईन पत्त्याचा जुगार आणि तत्सम जुगार बंद करा, नाहीतर प्रत्येक कार्यालयाच्या समोर आम्ही देखील जुगार खेळून शासनाच्या या ऑनलाइन जुगाराचा निषेध नोंदवू असे जाहीर आवाहन केले होते. त्याच पद्धतीने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी महाराष्ट्र शासनाला महसूल प्रशासनामार्फत स्पष्ट इशारा दिला आहे. उदगीर शहर, ग्रामीण भाग आणि आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, गुटखा असे अनेक अवैध धंदे राजरोसपणे चालू झाले आहेत. मटका या जुगार व्यवसायाने संपूर्ण तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. कायद्याने हा व्यवसाय चुकीचा आणि कायद्याचे उल्लंघन करणारा असून देखील दिवसाढवळ्या राजरोसपणे खेळला जात आहे. दर दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या जुगाराने अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. उदगीर परिसरात कायदा व सुव्यवस्था, शांतता कायम टिकून राहण्यासाठी अशा पद्धतीच्या जुगारांवर बंदी घालण्याची गरज आहे.
कालपर्यंत उदगीर तालुक्यांची ओळख संत महंतांची भूमी म्हणून तसेच शिक्षणाचे माहेरघर म्हणून होती. पण आता ती अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून होऊ लागली आहे. हे सर्व अवैध धंदे राजरोसपणे सुरू असताना देखील पोलीस प्रशासन काय करत आहे? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. उदगीर शहराच्या गर्दीने गजबजलेल्या उमा चौक, जय जवान चौक, आर्य समाज परिसर, बिदर नाका, बिदर गेटवरील उड्डाण पुलाच्या खाली तसेच नाईक चौक, दूध डेरी समोर, निडेबन रोड, शेळके रोड या चौक आणि मुख्य रस्त्यावर जुगाराणे बस्तान मांडले आहे.
उदगीर तालुक्यातील वाढवणा, हळी हंडरगुळी, गुडसुर, नळगीर या भागातही राजरोसपणे मटका आणि जुगार खेळला आणि खेळविला जात आहे. उदगीर आणि वाढवणा परिसरात जुगाराच्या बुक्क्यांनी शतक ओलांडले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाची उलाढाल होऊनही यातून एक रुपयाही कराच्या स्वरूपात शासनाला मिळत नाही. संपूर्ण पैसा हा काळ्या पैशाच्या स्वरूपात अवैध धंदे चालकांच्या खिशात जातो आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत. मटका जुगार तात्काळ बंद करून या जुगार व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई करावी, आणि जर प्रशासनास या अवैध धंद्यावर लगाम घालता येत नसेल तर मटका या जुगार व्यवसायाला कायदेशीर मान्यता देऊन अधिकृत परवाने देण्यात यावेत. जेणेकरून शासनाला यातून काहीतरी कर तरी मिळेल. जर हे होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलीस उपविभागीय कार्यालया समोर, उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर, तालुक्यातील इतर सर्व शासकीय कार्यालयासमोर मटक्याचा बुक्क्या चालू करून तीव्र निषेधात्मक आंदोलन हाती घेणार आहे. या संदर्भात या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन हे अवैध धंदे बंद करावेत, अन्यथा लवकरच मनसे स्टाईल आंदोलन हाती घेण्यात येईल. असा इशाराही महसूल प्रशासनामार्फत उपजिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. सदरील निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, उदगीर शहराध्यक्ष संतोष भोपळे, शहर सचिव लखन पुरी, तालुका अध्यक्ष शेतकरी सेना अजय भंडे, विनोद चव्हाण, भानुदास राजेकर, केदार पुरानिक, अजय शिंदे, नामदेव राठोड इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
