डेंगू पासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी – डॉ. शरदकुमार तेलगाने

0
डेंगू पासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी - डॉ. शरदकुमार तेलगाने

डेंगू पासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी - डॉ. शरदकुमार तेलगाने

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर तालुका हा महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमा भागात येतो. गेल्या आठवड्यात सीमा भागात जवळपास 185 डेंगूसदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकातील इतर भागातही 948 रुग्ण नोंदवले गेल्याची चर्चा आहे. उदगीर तालुक्याला लागून असलेल्या कमाल नगर तालुक्यात गेल्या 24 तासात 62 लोक डेंगूसदृश्य आजाराने रुग्णालयात दाखल झाले आहेत. या संदर्भात कमालनगर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायत्री यांनी नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर उदगीर येथील समाजसेवक तथा प्रबोधनात्मक किर्तनकार, उदगीर येथील ओम हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम चे ख्यातनाम डॉ. शरदकुमार तेलगाने यांनीही जनतेला डेंगू सदृश्य आजारापासून सावध राहण्यासाठी आवाहन केले आहे.
पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे डेंगूसदृश्य आजारासोबतच इतरही साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. पावसाळ्यात डास उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका संभवतो, शिवाय याच दिवसांमध्ये लहान मुले आणि वयोवृद्धांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते, त्यामुळे त्यांना अशा रोगांचा धोका अधिक असतो. डेंगू हा आजार या दिवसात पसरण्याची शक्यता असल्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुले या आजाराला सहज बळी पडतात, डेंगू हा आजार डासापासून होतो. या दिवसात डासांची पैदास रोखणे गरजेचे आहे. एडिस या डासापासून रोग पसरतो. प्रामुख्याने साचलेल्या पाण्यात हे डास वाढतात. अशा परिस्थितीत घरामध्ये किंवा घराच्या आसपास डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे. घराच्या आसपास कुठेही पाणी साचू देऊ नका. झाडाच्या कुंड्यातील पाणी काढून टाका, तसेच फाटलेले टायर असतील किंवा पाणी साठवण्यासाठी ठेवलेली इतर भांडी असतील ती सतत स्वच्छ करून कोरडा दिवस पाळा. बाळाला पूर्ण अंगभर कपडे घाला, डासापासून बचाव करण्याच्या दृष्टीने उपलब्ध असेल ती साधने वापरावीत. आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही खोदलेला खड्डा असेल तर त्या ठिकाणी पाणी साचू शकते, तुटलेले प्लास्टिक, बादल्या, टोपल्या, भांडी, डबके या ठिकाणी डास अंडी घालतात. त्यामुळे अशा परिसरांची वेळोवेळी स्वच्छता करून पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. असेही आवाहन डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी केले आहे. जर ताप आणि उलट्या किंवा तशा पद्धतीची कोणती लक्षणे आढळून आली तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.
सीमा भागातील जनतेसाठी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांनीही केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!