बसस्थानकाच्या आवारात चिखलच चिखल, प्रवाशांना नाहक त्रास : परिवहन मंडळाचे दुर्लक्ष

0
बसस्थानकाच्या आवारात चिखलच चिखल, प्रवाशांना नाहक त्रास : परिवहन मंडळाचे दुर्लक्ष

बसस्थानकाच्या आवारात चिखलच चिखल, प्रवाशांना नाहक त्रास : परिवहन मंडळाचे दुर्लक्ष

उदगीर (एल.पी.उगीले) : नेहमी हजारो प्रवाशांनी गजबजणाऱ्या उदगीर बसस्थानकात जागोजागी खड्डे पडून डबकी निर्माण झाली आहेत. तसेच परवा झालेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे बसस्थानकाच्या आवारात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

उदगीर बसस्थानकाच्या आवारात स्मार्ट बसस्थानकाचे काम स्मार्ट रित्या गेली दोन वर्षे झाली सुरू आहे. त्यातच पावसाला सुरुवात झाल्याने सर्वत्र चिखलच चिखल पहायला मिळत आहे. यातूनच बसचालकांना व प्रवाशांना वाट काढावी लागत आहे.

आवारात सगळीकडेच डबकी निर्माण होऊन चिखलाचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना कसरत करतच बसचा शोध घ्यावा लागत आहे. दरम्यान एखादी बस जवळून गेल्यानंतर चिखलाचे गढूळ पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. गतवर्षीदेखील पावसाळय़ात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. अहमदपूर , लातूर बसस्थानकाच्या थांब्याजवळ चिखल व डबक्याचे स्वरूप आल्याने प्रवाशांना बसमध्ये चढताना कसरत करावी लागत आहे. परिवहन महामंडळाकडून याची दखल घेऊन आवारातील खड्डे बुजवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. अत्यंत संथ गतीने बसस्थानकाचे काम चालू असल्याने सतत प्रवाशांची हेळसांड होत आहे. उन्हाळ्यामध्ये सर्वत्र धूळ उडत होती, थांबायला धड जागा नव्हती, पत्र्याचे शेड तेही अपुरे आहे. अशा परिस्थितीमध्ये तब्बल दीड वर्षाहून अधिकचा काळ गेला, तरीही कंत्राटदाराला जाग आलेली नाही. हे दुर्दैवाने नमूद करावे लागत आहे. कदाचित अशाच संथ गतीने काम करून वाढीव निधी मागवण्याचे षडयंत्र रचले जात आहे की काय? अशी शंका आता नागरिक घेऊ लागले आहे. जनतेची होणारी प्रचंड हेळसांड थांबली पाहिजे यासाठी महामंडळाच्या प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. बसस्थानकाचे आणखी निश्चित प्लॅटफॉर्म झालेले नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना विशेषतः अल्पशिक्षित किंवा अशिक्षित प्रवाशांना बस कुठे लागली हे विचारत फिरावे लागते. आणि अशा चिखलातून बस कडे पाहत चालायचे म्हटले तर चक्क तारेवरची कसरत करावी लागते, किंवा एखाद्या निसरड्या जागी पाय घसरून पडावे लागते. झकपक होऊन दुसऱ्या गावाला निघालेल्या प्रवाशांना चिखलाने माखलेल्या अवस्थेत गावी जाणे भाग पडते. हे असे प्रकार टाळले पाहिजेत. त्यासाठी कंत्राटदाराने नाहीतर नाही, किमान परिवहन महामंडळाने तरी जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी, आणि प्रवाशांच्या सोयीसाठी किमान मुरूम टाकून खड्डे बुजवून घ्यावेत. अशी रास्त मागणी प्रवाशाकडून होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!