उदगीर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस धुल्ला!! महसूलच्या टॅक्स वर दलाल मारतात डल्ला !!

0
उदगीर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस धुल्ला!! महसूलच्या टॅक्स वर दलाल मारतात डल्ला !!

उदगीर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस धुल्ला!! महसूलच्या टॅक्स वर दलाल मारतात डल्ला !!

उदगीर (एल पी उगीले) : तालुक्यात अवैध धंदे बोकाळले असतानाच, वाळू माफीयांनी देखील कसर ठेवली नाही. अगदी राजरोसपणे खुल्लम खुल्ला उदगीर तालुक्यात वाळूचा उपसा चालू आहे. अनेक बिना नंबरच्या हायवा आणि ट्रॅक्टर मधून वाळू मन मानेल त्या भावाने विक्री केली जात आहे. गंमत म्हणजे सध्या कोणत्याही घाटाचा लिलाव झालेला नाही, काही नदीतून तर बिनधास्तपणे विनापरवाना वाळूचा उपसा केला जातो आहे. त्याला ना महसूल प्रशासनाचा वचक आहे, ना पोलीस प्रशासनाचे भय आहे! हे घडते कसे? असा सर्वसामान्य माणसांना प्रश्न असला तरी लक्ष्मीची कृपा सर्व काही अलबेल करताना दिसून येत आहे. परिणामतः वाळू माफिया बिनधास्तपणे गौण खनिजाचे उत्खनन करून विक्री करण्यात मशगुल आहेत. या वाळू माफियांना जर कोणी हटकले, तर निर्लज्जपणे सांगतात तुम्हाला काय करायचे ते करून घ्या. हे सर्व व्यवहार देऊन घेऊनच चालू असतात. आम्हाला शहाणपण शिकवू नका. तुम्ही कोणाकडेही तक्रार केली तरी काहीच वाकडे होणार नाही. आता या वाळू माफियांना ही हिंमत कुठून आली? हा मोठा प्रश्न आहे.
उदगीर तालुक्यातील मोठमोठ्या गावांमध्ये या वाळू माफियांचे एजंट नेमलेले आहेत. या एजंटामार्फत वाळू पुरवठा केली जाते. अनेक ठिकाणी तर या वाळू माफीयांनी आपल्या छोट्याशा दुकानाच्या समोर मोठमोठे वाळूचे ढीग लावून पाट्या लावून ठेवलेल्या आहेत. इतक्या जग जाहीरपणे वाळूची तस्करी होत असताना प्रशासन गप्प का? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे वाळू माफीयांची आणि दलालांची इतकी हिम्मत वाढलेली आहे की, ही वाळूची तस्करी दिवसाढवळ्या बिनदिकत सुरू आहे. या खुल्या अवैध धंद्याचे गोड बंगाल काय आहे? हे सर्वांना कळत असले तरी प्रत्येक चौकाचौकांनी कुजबुज मात्र पोलिसांच्या नावाने बोटे मोडण्यातच होत आहे. ही वाळू ज्या नदीतून उपसा केली जाते, त्या नदीपासून ते ग्राहकांच्या घरापर्यंत वाळूची तस्करी होत असताना मध्यस्थी असलेल्या अनेक दलालांच्या हातावर काहीतरी टिकवल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळेच आम्ही बिनधास्तपणे धंदा करू शकतो. असे एका टिप्परच्यालकांनी सांगितले आहे. ही देवाणघेवाण एजंटामार्फत प्रत्येक ठिकाणच्या अधिकाऱ्यांना होत असल्याचे समजते.
या एजंट नावाच्या दलालामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा कर बुडतो आहे. चिरीमीरी च्या नादात पोलीस प्रशासनातील कर्मचारी ही या व्यवसायाकडे कानाडोळा करून अप्रत्यक्षपणे वाळू माफियाना पाठराखणच करत आहेत की काय? असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
उदगीर तालुक्यातून काही नाद्यातून प्रत्यक्ष उपसा करून ही काळी वाळू ची तस्करी केली जाते. तर काही वाळू गंगाखेड, कंधार, मुखेड या ठिकाणावरून ही आणली जाते. या टिप्परच्या वेळा आणि मार्गही निश्चित ठरलेले असल्यामुळे या टिप्परला साधा हात सुद्धा कोणी दाखवत नाहीत. एखादा टिप्पर चा ठरलेला हप्ता जर चुकलाच तर मात्र ते टिप्पर बरोबर कुठे ना कुठे पकडले जातेच! या वाळू तस्करीला अभय नेमके कुणाचे आहे? याचा शोध प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. अन्यथा या तस्करीला मिळणारे अभय हे शासनाला भुर्दंड घालणारे आहे. किमान नैतिक जबाबदारी म्हणून तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज उपसा व्यवहाराकडे पाहणे गरजेचे आहे. जसे वाळूची तस्करी आहे, तशाच पद्धतीने शासकीय, गायरान जागेवरील डोंगर पोखरणेही चालू आहे, मुरमाचाही व्यवहार मोठ्या प्रमाणात केला जातो आहे.

चौकट…..
तहसीलदारांनी जप्त केलेले ट्रॅक्टर चोरट्यांनी पळवले !!

अवैधरित्या गौण खनिजाचा उपसा होत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी तहसीलदार राम बोरगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांच्या पथकाने अवैधरित्या मुरमाचे उत्खनन करून घेऊन जाणारे तीन ट्रॅक्टर जप्त करून काही दिवसापूर्वीच कारवाई केली होती. जप्त करण्यात आलेले तिन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले होते, परंतु तहसील कार्यालयाच्या आवारातून मुरमाणे भरलेल्या तिन्ही ट्रॅक्टरची चोरी झाली, या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरटेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणातूनच पोलीस प्रशासन किती दक्ष आहे? हे लक्षात येऊ शकेल. जर शासकीय कार्यालयातून तीन-तीन ट्रॅक्टर मुरुमाने भरलेले चोरी होत असतील तर पोलीस प्रशासनाची कर्तबगारी निश्चित वाखाणण्याजोगीच आहे! असेच म्हणावे लागेल! तहसीलदार राम बोरगावकर, मंडळ अधिकारी शंकर जाधव, तलाठी पंकज कांबळे, तलाठी बाबासाहेब कांबळे यांनी आयटीआय कॉलेज परिसरात मुरमाचे अवैधरित्या उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी छापा मारला. यावेळी एका पोकलेन द्वारे मुरूम खोदून ट्रॅक्टर मध्ये भरून घेऊन जाण्यात येत होते. तहसीलदार बोरगावकर यांनी त्या ठिकाणावरून दोन ट्रॅक्टर तर तिसरे ट्रॅक्टर देगलूर रोड वरून जप्त केले होते. हे तिन्ही मुरमाने भरलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात आणून उभे केले होते. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने कार्यालयाला सुट्टी होती, सोमवारी सकाळी तहसील कार्यालयातील जप्त करण्यात आलेले तिन्ही ट्रॅक्टर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले!
गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफीयांची एवढी मोठी हिम्मत कुणाच्या जीवावर वाढली? हा संशोधनाचा विषय आहे.

चौकट……
ग्रामीण हद्दीतील अवैध धंद्यावर लक्ष कोण ठेवणार ?

दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत चालले आहेत. मात्र त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. विशेष म्हणजे नको त्या धंद्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलेली चर्चा सध्या उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे वरिष्ठ पातळीवर अवैध धंद्याच्या विरोधात मोहीम काढणे गरजेचे आहे. लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा खूप सक्रिय आहे. अनेक गुंतागुंतीचे गुन्हे ते शोधून काढतात, अनेक ठिकाणच्या अवैध धंद्यावर त्यांनी धाडी टाकलेल्या आहेत. मात्र जिल्हा पातळीवर असलेल्या या शाखेला उदगीर सारख्या मोठ्या तालुक्याचे ठिकाण का दिसत नसेल? असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

चौकट…….
त्या दोन ट्रकचे काय होणार ?

अवैध पद्धतीने वाळू वाहतूक करत असताना, प्रत्येक गाडीला मोठ्या रकमेचा हप्ता ठरलेला असतो. त्या क्रमांकाची गाडी आली तर तिला कोणी अडवत नाही, हे एका क्षणाक्ष ड्रायव्हरने ओळखले, आणि आपल्या मालकाच्या सारख्याच दिसणाऱ्या दोन ट्रकवर एकच नंबर टाकून, दोन्ही ट्रक अवैध वाळू वाहतुकीला वापरायला सुरुवात केली. कर्म धर्म संयोगाने त्या दोन्ही गाड्या दुसऱ्याच एका पोलिसांकडून पकडल्या गेल्या. आता या गाड्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, केवळ उदगीर ग्रामीण पोलिसांनी यासंदर्भात आरटीओ कार्यालयाकडे तक्रार केली. आरटीओने येऊन तपासणी केली आणि तपासणी अहवाल ग्रामीण पोलिसाकडे दिला. ग्रामीण पोलिसांनी त्यानंतर ही कोणती कारवाई केली नाही मात्र त्या दोन्हीही ट्रक तब्बल दोन वर्षापासून थांबून ठेवल्या आहेत. त्या ट्रकचे पुढे काय होणार? जर गुन्हा दाखल झाला असता तर ट्रक मालकाने कोर्टातून तरी त्या गाड्या सोडवून घेतल्या असत्या, मात्र गुन्हा दाखल न करताच तब्बल दोन वर्षापासून ट्रक ग्रामीण पोलिसाकडेच आहेत. आता याचे काय होणार हा संशोधनाचा विषय आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!