आतून ‘शुद्ध’ आणि वरून ‘तत्वशुद्ध’ असतो तोच गुरु – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
आतून 'शुद्ध' आणि वरून 'तत्वशुद्ध' असतो तोच गुरु - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : आजच्या काळात गुरुला गुरु म्हणून समजून घेण्याची वेळ आली आहे. कारण विद्यार्थ्यांमध्ये संवेदना दिसून येत नाही, त्या संवेदना जागृत करण्याचे कार्य या काळात गुरुलाच पार पाडावे लागेल. कारण गुरू हा देवाने पृथ्वीवर पाठविलेला देवाचा प्रतिनिधी असून जो आतून ‘शुद्ध’ आणि वरून ‘तत्वशुद्ध’ असतो तोच आजच्या काळातला खरा गुरू आहे असे प्रतिपादन मराठी साहित्याचे समीक्षक तथा ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अर्थात आय. क्यू . ए .सी. च्या अंतर्गत घेण्यात आलेल्या आषाढ शुद्ध पौर्णिमा निमित्त गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘सत्कार गुरुजनांचा ‘ या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभागातील प्रोफेसर ह. भ. प. डॉ. अनिल मुंढे महाराज हे होते तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तसेच प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार करून सन्मान केला. पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, मातृ-पितृ , गुरु, समाज ,देव ऋणाबरोबरच राष्ट्र ऋणातून मुक्त होण्यासाठी संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकाचे कार्य आहे आणि ते कार्य शिक्षक जेव्हा निष्ठेने पार पाडतो त्यावेळेस आदर्श नागरिक निर्माण होतात, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रो. डॉ. अनिल मुंढे म्हणाले की, आचार , विचार आणि संस्कार देण्याचे काम गुरु करतो. ‘गुरु तेथे ज्ञान… गुरू तेथे आत्मदर्शन… दर्शनी समाधान गुरु माझा ..’. या संत वचनाप्रमाणे गुरु शिष्याला घडवीत असतो, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. कवी मारोती कसाब यांनी व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
