प्रत्येकाच्या जीवनात आई, वडील पहिले गुरु असतात – डॉ. लखोटिया
प्रत्येकाच्या जीवनात आई, वडील पहिले गुरु असतात - डॉ. लखोटिया
उदगीर (एल पी उगिले) : जीवनामध्ये जन्मापासून ते त्या व्यक्तीचे जीवनमान विकसित होईपर्यंत प्रत्येक घडीला आई-वडिलांचे संस्कार आणि शिकवण त्यांना घडवत असते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडील हे गुरु असतात. असे उद्गार उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी काढले. ते गुरुपौर्णिमा सप्ताह निमित्त अरुणा अभय ओसवाल फॉर ब्लाइंड स्कूल येथील अंध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लॉ. अशोक भाई मेहता सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, प्रा. स्मिता लखोटिया, प्रा. अर्चना मोरे, प्रा पुष्पलता काळे, डॉ माधव मधुकर, विवेक जैन, प्रा.साबदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती तसेच लुई ब्रेल, हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी सोनी वाघमारे या विद्यार्थिनींनी गीत गायले तर सीमा सावंत या अंध विद्यार्थिनींनी गुरुगीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले.
पुढे बोलताना डॉ. रामप्रसाद लखोटिया म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनात गुरु येतच असतो. तुम्ही कोणतेही कार्य हाती घ्या, त्या कार्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शकाची, गुरुची गरज असते. शिक्षक आणि पालकांनी केलेल्या संस्कारामुळे विद्यार्थी जीवनात यशस्वी होत असतात. आपल्या योग्यता आणि पात्रतेनुसार तुम्ही कोणत्याही पदावर जा, कोणतेही अधिकारी व्हा, व्यापारी व उद्योगपती व्हा, पण तत्पूर्वी तुम्ही माणूस बना. सामाजिक जाणिवा जोपासा असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात विकासात पालकांचा आणि गुरूंचा महत्त्वाचा वाटा असतो, असेही सांगितले.
यावेळी राजेंद्र चव्हाण, प्रा अजय भालेराव, रेखा माने, रवी जवळे, गणेश मुंडे, प्रा. मुक्कावार यांच्यासह अंध विद्यार्थी व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोध्या पवार, शशिकांत पंचगुडे यांनी तर आभार प्रदर्शन नवनाथ गडदे यांनी केले.
