उदगीर येथे स्वामुक्टाचा जिल्हा मेळावा संपन्न

0
उदगीर येथे स्वामुक्टाचा जिल्हा मेळावा संपन्न

उदगीर येथे स्वामुक्टाचा जिल्हा मेळावा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आजमितीला प्राध्यापकांचे विविध प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत. सदरील प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ एम.फुक्टोच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. उच्च शिक्षण विभागाकडून वारंवार संविधानातील तरतुदींमध्ये घरगुती पद्धतीने बदल करून सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात विविध आंदोलनात्मक कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यातलाच एक टप्पा म्हणून येत्या 16 ऑगस्ट 2024 रोजी विद्यापीठावर भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व प्राध्यापकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष, स्वामुक्टाचे केंद्रीय अध्यक्ष व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड यांनी केले. ते शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथे संपन्न झालेल्या जिल्हा मेळाव्यामध्ये बोलत होते. विचारपीठावर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, अधिसभा सदस्य डॉ. विजय भोपाळे, डॉ. करुणा पतंगे, डॉ. व्ही. एम. पवार, स्वामुक्टाचे जिल्हा सचिव डॉ. अमोल लाटे इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. जोगदंड यांनी प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवर स्वामुक्टाच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. डॉ. डी. एन. मोरे यांनी एम. फिल.च्या प्राध्यापकांवर होणाऱ्या अन्यायाची सविस्तर चर्चा करून त्याबाबत स्वामुक्टाने घेतलेल्या भूमिकेची चर्चा केली. डॉ. विजय भोपाळे व डॉ. करुणा पतंगे-देशमुख यांनी संघटनेतर्फे पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या विविध टप्प्यांविषयी माहिती दिली.
डॉ. अमोल लाटे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना जुन्या पेन्शन संबंधी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली व ओट फॉर ओपीएसचे आवाहन केले. अधिसभा सदस्य डॉ. व्ही.एम. पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन व संचालन केले तर प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी उदगीर, देवणी, जळकोट तालुक्यातील शिवाजी महाविद्यालय, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, श्री हावगीस्वामी महाविद्यालय, बापूसाहेब एकंबेकर महाविद्यालय, उदगीर व रसिका महाविद्यालय, देवणी येथील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!